जातीय समीकरणं जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले, अशोक गेहलोत यांचं आक्षेपार्ह विधान

0

जयपूर, दि.17 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जातीवरून केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधल्या एका सभेमध्ये भाषण करताना हे वक्तव्य केलं. ’गुजरातच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यावेळी भाजपला गुजरातमध्ये यश येणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे जातीय समीकरणं जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं आणि लालकृष्ण अडवाणींना हे पद मिळालं नाही’, असं अशोक गेहलोत म्हणाले आणि वाद पेटला.
अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या राजकारणात थेट राष्ट्रपतींनाच ओढल्यामळे या लोकसभा निवडणुकीत हा वाद चांगलाच स्फोटक बनला आहे. अशोक गेहलोत हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी हे वक्तव्य करून गंभीर वादाला तोंड फोडलं आहे. राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला चांगलं यश मिळालं आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी गेहलोत यांनी तयारी चालवली आहे. याआधी, कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुस्लीम समुदायासमोर केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. बिहारमधल्या कटिहारमध्ये सिद्धू यांनी मुस्लीम मतदारांना, मोदींना मत न देण्याचं आवाहन केलं होतं.

Share.

About Author

Leave A Reply