भांडवल बाजारातील विक्रमी तेजीचा सरकारला फायदा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भांडवल बाजारातील विक्रमी तेजीचा सरकारला फायदा

शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या विक्रमी तेजी सरकारसाठी फायदेशीर ठरली आहे. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या साडेपाच महिन्यांत म्हणजे एक एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान रोखे व्यवहार कर (एसटीटी) संकलन ११ हजार कोटी रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचलेले आहे. हे २०१९-२० कोविडच्या आधीच्या संपूर्ण वर्षातील १२,३७४ कोटी रुपये आणि २०२१ - २२ या संपूर्ण वर्षातील १२,५०० रुपयांच्या सुधारित अंदाजाच्या जवळपास आहे.

लॉकडाऊनदरम्यान लोकांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. परिणामी, ही वाढ दिसून आली. पहिल्या सहामाहीप्रमाणे शेअर बाजारातील तेजी अशीच राहिली तर या आर्थिक वर्षात एसटीटीच्या मदतीने सरकारला संकलनातून २१ हजार ते २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एसटीटीचा दर ०.००१ % ते ०.२ % दरम्यान आहे. हा करपात्र राेख्यांच्या व्यवहारावर आकारला जातो. यामध्ये शेअर बाजारातील कंपनीचे इक्विटी शेअर्स. डेरिव्हेटिव्ह, इक्विटी म्युच्युअल फंड युनिटची खरेदी - विक्री याचा समावेश आहे. याशिवाय युनिटशी निगडित विमा पॉलिसीच्या संदर्भात (युलिप) ते विमा कंपनीला इक्विटी ओरिएंटेड निधीच्या युनिट्सची विक्री/सरेंडर/रिडम्प्शन, मॅच्युरिटी किंवा अंशत: पैसे काढण्यावर आकारले जाते.रोखे व्यवहार करसंकलन वाढण्याच्या मुख्य कारणामुळे शेअर बाजारात तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक या वर्षात ३१ मार्चला ४९,५०९ अंकांवर बंद झाला होता, तो आता ६० हजारांच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे निफ्टीदेखील याच कालावधीत १४,६९१ अंकांनी उसळून १७,८०० अंकांपर्यंत गेला आहे.