मेरी कोमकडून पदकाची अपेक्षा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मेरी कोमकडून पदकाची अपेक्षा

नवी दिल्ली -एक खेळाडू म्हणून ही माझी अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. उद्‌घाटन सोहळ्यात संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. यासाठी मी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची आभारी आहे. मी पदक मिळवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईन, असा निर्धार भारताची ऑलिम्पिक पदकविजेती महिला मुष्टियुद्धपटू मेरी कोम हिने व्यक्‍त केला आहे.

मेरी कोम ही भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे. 2012 साली मेरीने ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकसाठी मेरी पात्र ठरली नव्हती. 2014 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्ण, तर नुकत्याच झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत रजतपदक जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा गेल्या वर्षी खेळवली जाणार होती. पण करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच भारताकडून पुरुष आणि महिला असे दोन ध्वजवाहक असणार आहेत. याआधी भारताचा एकच ध्वजवाहक असायचा, पण लैंगिक समानतेला योग्य न्याय देत, आता दोन ध्वजवाहक निवडण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी दिली आहे.

हॉकीपटू मनप्रीत सिंग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. 2016 सालापासून तो भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार आहे. 2014 सालच्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रजतपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. भारतीय पथकात 126 खेळाडू आणि 25 प्रशिक्षक तसेच अधिकारी अशा एकूण 201 जणांचा समावेश आहे. तसेच भारतीय पथकातील 126 खेळाडूंपैकी 56 टक्‍के खेळाडू हे पुरुष असून, 44 टक्‍केमहिला खेळाडू आहेत, अशी माहिती आयओएकडून देण्यात आली.