पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या तत्वांशी काही घेणे-देणे नाही - भारत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या तत्वांशी काही घेणे-देणे नाही - भारत

न्यूयॉर्क, : पाकिस्तान सातत्याने त्यांच्या शेजारील देशांच्या विरोधात दहशतवादाचा वापर करत आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या त्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या तत्वांशी काही घेणं-देणं नाही, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या सत्राची चर्चा सुरू असताना भारताचे प्रतिनिधी ए अमरनाथ यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत पाकिस्तानच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले की, पाकिस्तानने भारत तसेच अफगाणिस्तान विरोधात आणि इतरही शेजारील देशांच्या विरोधात नेहमीच दहशतवाद्यांचा वापर केला आहे. एकीकडे पाकिस्तान या जागतिक व्यासपीठावर शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवतोय आणि दुसरीकडे त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान हे दहशतावादी ओसामा बिन लादेनचा उल्लेख 'शहीद' असा करून त्याचे उदात्तीकरण करतात.

पाकिस्तानने कायम भारताविरुद्ध वापरले युनोचे व्यासपीठ

पाकिस्तानने भारतावर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या संदर्भात टीका केली. पण हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याने या टीकेला उत्तर द्यायला भारत बांधील नाही. जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण प्रदेश हा भारताचा होता आणि भारताचाच राहणार. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे. पाकिस्तानने भारताचा अवैध मार्गाने बळकावलेला भाग हा तात्काळ परत करावा. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा वापर नेहमी भारताविरोधात केला आहे. त्याला भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिल्याने प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडघशी पडल्याचे दिसते, असेही ए अमरनाथ म्हणाले.