यंदाच्या नऊमाहीत शेअर बाजार सोने पे सुहागा; जानेवारी ते सप्टेंबर काळात सेन्सेक्सचा 21 टक्के परतावा, सोने काळवंडले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

यंदाच्या नऊमाहीत शेअर बाजार सोने पे सुहागा; जानेवारी ते सप्टेंबर काळात सेन्सेक्सचा 21 टक्के परतावा, सोने काळवंडले

यंदाच्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे. सोने, चांदी या मौल्यवान धातूतील गुंतवणुकीने मात्र निराश केले आहे. या काळात सेन्सेक्सने २१ टक्के, निफ्टीने २० टक्के रिटर्न दिले. याउलट सोन्याने उणे आठ टक्के, तर चांदीने उणे १२ टक्के असा नकारात्मक परतावा दिला आहे.

कोरोनाकाळात शेअर बाजारात चांगली तेजी राहिली. जानेवारीनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी जबरदस्त उसळी घेतली. एक जानेवारी रोजी सेन्सेक्स ४७८६८.९८ अंकांवर होता, तो नऊ महिन्यांत वाढून ३० सप्टेंबर रोजी ५९१२६.३६ पोहोचला. निफ्टी १४०१८.५० अंकांवर होता, तो सप्टेंबर अखेर १७६१८.१५ अंकांवर होता. सोने जानेवारीत दहा ग्रॅममागे ५०२०८ रुपये होते ते आता ४६००० रुपयांच्या पातळीत आहे. चांदी जानेवारीत किलोमागे ६८,११० रुपयांवर होती, ती आता ६०८०० रुपये आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच २०२० मध्ये सोने गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला होता. जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात सोन्याने ३१.०५ टक्के परतावा दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत थोडी जोखीम पत्करत अधिकाधिक परतावा देणाऱ्या साधनांकडे गुंतवणूकदार वळत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

सेन्सेक्स ठरला वरचढ

गुंतवणूकदाराने जानेवारीत समजा १० हजार रुपये सेन्सेक्समध्ये गुंतवले असतील तर त्याचे सप्टेंबरअखेर १२१०० रुपये मूल्य झाले. १० हजार रुपये सोन्यात गुंतवले असते तर त्याचे सप्टेंबरअखेर ९२०० रुपये मूल्य झाले. या नऊ महिन्यांत सेन्सेक्स वरचढ ठरला.