अफगाणिस्तान : कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अफगाणिस्तान : कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला

कंदहार : अफगाणीस्तानचे सैन्य आणि तालिबानी दहशतवादी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री रॉकेट हल्ला करण्यात आला. विमानतळावर एकूण तीन रॉकेट डागण्यात आले. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमाने रद्द करण्यात आली.
अमेरिकन सैन्याने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभे ठाकले आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबानने अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदाहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंदाहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. कंदहार विमानतळाला शनिवारी रात्री लक्ष्य करण्यात आले. तीन रॉकेट विमानतळाच्या दिशेने डागण्यात आले. यात एक विमानतळाला धडकले, तर दोन विमानाच्या हवाई पट्ट्यांवर. त्यामुळे रनवेचे नुकसान झाले असून, विमानं रद्द करण्यात आली. यापूर्वी एप्रिल २०२१ रोजीही कंदाहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता. तालिबानने उत्तर अफगाणिस्तान या त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात जम बसवला असून तेथे वांशिक अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. अनेक कुटुंबे पलायन करीत असून भीतीयुक्त जीवन जगत आहेत. गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने सांगितले आहे.