पुन्हा कश्मिर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुन्हा कश्मिर

लखीमपूर खिरी हिंसाचारामुळे देशात वातावरण बदलले असल्याने कश्मिरमधील घटनाक्रमाकडे माध्यमांचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळेच कश्मिरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याच्या आणि दहशतवाद्यांनी जे हत्यासत्र सुरू केले आहे, त्याकडे लखीमपूर खिरी प्रकरणी राजकारण करण्यात गुंतलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले नाहि. पण कश्मिरात गेली दीड दोन वर्षे जे सौहार्द्राचे वातावरण होते, ते दहशतवाद्यांना पचलेले नाहि. त्यांना कश्मिर धगधगत ठेवायचा आहे. त्यामुळेच त्यांनी बिगर मुसलमानांच्या हत्या पुन्हा सुरू केल्या आहेत. ४० तासांत पाच हत्या करून दहशतवाद्यांनी कश्मिर अशांत कसे राहिल, हेच पाहिले आहे. यावेळी त्यांनी ज्यांच्या हत्या केल्या, त्यात प्रसिद्ध कश्मिरी पंडित आणि केमिस्ट माखनलाल बिंदू, प्राचार्या सतिंदर कौर आणि शिक्षक दीपकचंद यांचा समावेश आहे. ही अशी मंडळी आहेत की ज्यांच्याबद्दल प्रत्येक कश्मिरी नागरिकाला अभिमान वाटायला हवा. बिंदू हे कश्मिरी पंडित असून त्यांना अनेकांनी विशेषतः कश्मिरी पंडितांनी राज्य सोडून देशात अन्य कुठेतरी स्थायिक होण्याचा आग्रह केला होता. पण बिंदू यांचा स्वतःची भूमी सोड़ून जाणार नाहि, हा निर्धार कायम होता. त्यांना ठार मारून दहशतवाद्यांनी त्यांना आपल्या कश्मिरप्रेमाचेच बक्षिस दिले आहे. तसेच त्या सतिंदर कौर. त्या शिख होत्या म्हणून दहशतवाद्यांनी त्यांना इतरांपासून वेगळे करून ठार मारले. पण संकुचित आणि अडाणचोट दहशतवाद्यांना हे माहित नव्हते की, त्यांनी एक मुस्लिम मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली होती आणि तिला एका मुस्लिम परिवारातच ठेवले होते. तिच्यासाठी दर महिना त्या १५ हजार रूपये खर्च करत होत्या. दहशतवाद्यांनी त्या मुस्लिम मुलीला अनाथ केले आहे. बिंदू यांच्या कन्येने दहशतवाद्यांनी त्यांच्या वडलांना दुकानात घुसून भ्याड हल्ला करून ठार मारल्यानंतरही कश्मिरमध्येच रहाण्याचा धाडसी निर्धार व्यक्त केला आहे. खरेतर दहशतवाद्यांचा तेथेच पराभव झाला आहे. बिंदू परिवाराचे धैर्य आणि शौर्य दोन्ही अनुकरणीय आहे. दहशतवाद्यांनी यावेळी अशा लोकांना विनाकारण ठार मारले आहे, ज्यांच्याबद्दल पूर्ण कश्मिरला अभिमान वाटेल. हा कोणत्या प्रकारचा जिहाद आहे, हा सवाल दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाकिस्तानातील पाठिराख्यांना विचारला पाहिजे. सतिंदर कौर तर आपला अर्धा पगारच गरिब मुलामुलींवर खर्च करत होत्या आणि त्यात हिंदू, मुस्लिम, शिख वगैरे भेदाभेद मुळीच करत नव्हत्या. दहशतवाद्यांनी या गरिब मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. अशा महिलेची हत्या करून दहशतवाद्यांनी कश्मिरींनाच कलंकित केले आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. अलिकडेच दहशतवाद्यांनी जे हत्यासत्र आरंभले आहे, त्याचे एक कारण असेही सांगितले जाते की, कश्मिरमध्ये मोदी सरकारने पंडितांना त्यांच्या गेलेल्या जमिनी परत देण्याचे अभियान सुरू केले आहे. यामुळे दहशतवाद्यांचा जळफळाट झाला असून त्यांनी पडितांची हत्या सुरू केल्या आहेत. तसे असेल तर गृहमंत्रि अमित शहा यांनी दहशतवाद्यांना ताब़डतोब पकडून कठोरातील कठोर शिक्षा करण्याचे दुसरे अभियान चालवले पाहिजे. शिक्षा इतकी कडक हवी की पुन्हा कोणत्याही दहशतवाद्याचे असली हत्या करण्याचे धाडस होऊ नये. आणि शिक्षकांना यासाठी ठार मारण्यात आले कारण त्यांनी १५ ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी मुलांना आग्रह केला होता. यात काहीच चूक नाहि. कश्मिर भारतात आहे आणि कुणीही ते भारतापासून घेऊ शकणार नाहि. त्यामुळे त्यांनी जर मुलांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा आग्रह केला असेल तर तो राष्ट्रभक्तिचाच आविष्कार समजला पाहिजे. खरेतर कश्मिरी राजकीय नेत्यांनी आता तरी दहशतवाद्यांची किंवा पाकिस्तानला मदत होईल अशी भूमिका न घेता या हत्यांचा कडक निषेध केला पाहिजे. केवळ नक्राश्रु ढाळून काहीही उपयोग नाहि. हिंसाचार कुणीही करो, त्याच्या कृत्याची कठोर शब्दात निंदा करायला पाहिजे आणि कारवाईही केली पाहिजे. मग ते दहशतवादी असोत, हिंदू असोत की मुसलमान असोत. कश्मिरी पंडितांना पुन्हा त्यांची इस्टेट प्रदान करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे कश्मिरी मुस्लिम संतप्त झाले आहेत, असे सांगण्यात येते. यात काहीच अर्थ नाहि. जी इस्टेट ज्यांची होती त्यांना ती परत दिली तर राग कशाला यायला हवा, हा सवाल त्यांना केला पाहिजे. या अनुषंगाने आणखी एक मुद्दा आहे. बिहारचे अनेक गरिब मजूर लोक कश्मिरमध्ये कामाच्या शोधात येतात. त्यातच वीरेंद्र पासवान नावाचा मजूर भागलपूर जिल्ह्यातून कश्मिरमध्ये आला होता. याच हत्याकांडात दहशतवाद्यांकडून तोही मारला गेला. पण त्याच्या हत्येबद्दल न कुणी शोक व्यक्त केला न कुणी निषेध. श्रीनगरचे महापौर जुनैद अजिम मट्टू यांनी भागलपूरमध्ये नाहि तर श्रीनगरमध्ये जे आमचे बांधव मारले गेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी जायचे आहे. हे संवेदनाशून्य वक्तव्य आहे. भागलपूरचा असला तरीही वीरेंद्र पासवान हा माणूसच होता आणि त्याचीही काहीही कारण नसताना दहशतवाद्यांनी गोळ्यांनी चाळण केली होती. त्यामुळे त्याच्या परिवाराला भेटायला जाणे हेही मट्टू यांच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्या कुटुंबियांना केवळ सव्वालाख रूपये देऊन त्याची हानी भरून निघणार नाहि. असंवेदनशीलतेचे हे एक उदाहरण झाले. पण कश्मिरात पुन्हा जी दहशतवादाची विषवल्ली उगवण्यास सुरूवात झाली आहे, ती वेळीच उखडून फेकायला हवी.