आर्यनसह तिघांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आर्यनसह तिघांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मुंबई, ११ ऑक्टोबर (हिं.स.) : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला बुधवारपर्यंत तुरुंगात रहावे लागणार आहे. एनसीबीने आरोपींच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यामुळे आता आर्यनसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी होणार आहे.

एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील ड्रग पार्टीमध्ये ताब्यात घेतले होते. एनसीबीने दावा केला होता की, या कारवाई दरम्यान क्रूझवरून अनेक वेगवेगळे ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयाने आर्यनसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान शनिवारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी न्यायालयाचे म्हणणे होते की, एनडीपीएसच्या ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्या कलमांतर्गत जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा त्यांना अधिकार नाही. न्यायालयाचे हे निर्देश येईपर्यंत सायंकाळचे 5 वाजले होते. त्यामुळे बचाव पक्षाचे वकील सत्र न्यायालयात याचिका दाखल करू शकले नाहीत.

पुढे सत्र न्यायालय बंद असल्यामुळे आज सोमवारी तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला. सुनावणी दरम्यान किमान दोन-तीन दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला दिले आहेत. त्यामुळे आता आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आता थेट बुधवारी सुनावणी होणार आहे.