टी २० वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच होणार DRS चा वापर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टी २० वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच होणार DRS चा वापर

टी २० वर्ल्डकपसाठी भारतासह सर्वच संघांनी कंबर कसली असून चषक नावावर करण्यासाठी रणनिती आखली आहे. १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. टी २० वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागचा वर्ल्डकप २०१६ मध्ये झाला होता. तेव्हा टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती. मात्र महिलांच्या टी २० विश्वचषकात याचा वापर केला गेला आहे. २०१८ मध्ये कॅरेबियन भूमीवर झालेलव्या महिला टी २० विश्वचषकात डीआरएस प्रणालीचा वापर केला गेला. मैदानात पंचांकडून निर्णय घेताना झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी डीआरएसची सुरुवात करण्यात आली होती. डीआरएस घेत फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. त्याचबरोबर स्टम्पिंगसारखे निर्णय घेताना मैदानातील पंच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. २०१७ पासून आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेत डीआरएसचा वापर केला जात आहे.गेल्या वर्षी जून महिन्यात आयसीसी गर्व्हनिंग कॉन्सिलने क्रिकेटच्या सर्व प्रकारात प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावात प्रती संघ अतिरिक्त डीआरएस मंजूर केला आहे. करोनामुळे मैदानावर कमी अनुभवी पंचांची उपस्थिती पाहता, हा निर्णय घेतला गेला. यानंतर प्रत्येक संघाला टी २० आणि एकदिवसीय सामन्यातील प्रत्येक डावात दोन रिव्ह्यू देण्यात आले. तर कसोटीतील प्रत्येक डावात तीन रिव्ह्यू देण्यात आले. आयसीसीने विलंबित आणि पावसामुळे होणाऱ्या सामन्यांसाठी किमान षटकांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेताल आहे. डकवर्थ आणि लुईस निकाल मिळवण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे. हा नियम उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी वेगळा असेल. या दोन सामन्यात प्रत्येक संघाला किमान १० षटकं फलंदाजी करणं आवश्यक आहे.