सावधान! कोरोना वाढतोय; नगरमधील 27 गावात टाळेबंदी!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सावधान! कोरोना वाढतोय; नगरमधील 27 गावात टाळेबंदी!

अहमदनगर, दि. 30 : संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असलेल्या गावात लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 27 गावे 5 ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खळी, पिंप्री, लौकि, जाखुरी, पानोडी, मणोली, घुलेवाडी या गावांसह एकूण 27 गावे प्रशासनाने बंद केली आहेत. जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाची गती खाली येऊ लागली आहे. मात्र, चिंतेची बाब, म्हणजे संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. आज शहरासह तालुक्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य व्यवस्थेची चिंता दुप्पट झाली आहे. एकीकडे वरीष्ठ पातळ्यांवरुन आदेशामागून आदेशाची रिघ लागलेली असताना दुसरीकडे त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडच्या सावटाखाली आला आहे. रुग्णवाढ गेली तीन दिवस खालावलेली होती. आज मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज संगमनेर शहरातील 11 जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता एकूण 33 हजार रुग्णांचा टप्पा गाठला आहे.