कॅप्टनचा राजिनामा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कॅप्टनचा राजिनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. अर्थात त्यांना तो द्यावा लागला. कारण काही मिनिटे अगोदर अमरिंदर यांना पक्षश्रेष्ठींकडून पदत्याग करण्याचा आदेश आला होता. विधिमंडळ कांग्रेसची बैठक बोलवली होती आणि त्यात अमरिंदर यांची उचलबांगडी करण्याचे ठरले होते. याची खबर लागताच वस्तीच्या अमरिंदर यानी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे जाऊन राजिनामा सोपवला. मध्यंतरी अमरिंदर यांचे कडवे शत्रु नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करून दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयोग फसल्याचे लक्षात आले. कारण दोघांमध्ये मनोमिलन असे झालेच नाहि. काही महिन्यांवर निवडणूक आली असताना कांग्रेसला हा वाद चिघळत ठेवणे परवडणारे नाहि. अमरिंदर यांना राजिनामा द्यायला सांगण्यामागे अनेक कारणे आहेत.पण मुख्य कारण म्हणजे अमरिंदर यांचे अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्याशी असलेले मधुर संबंध असल्याचे सांगितले जाते. गुरू ग्रंथ साहिबची पाने फाडल्याच्या प्रकरणी दोषींना शिक्षा करण्याचे आश्वासन देऊन अमरिंदर सत्तेत आले. पण चार वर्षांत काहीही कारवाई झाली नाहि. यामुळे कांग्रेसमधील सिद्धू गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. हा विषय कांग्रेसचे नुकसान करणारा आहे, हे लक्षात आल्यावर सोनिया़ंना अमरिंदर यांचा राजिनामा मागण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. बाकी जी कारणे सांगितली जातात की अमरिंदर आपल्या चौकडीच्या कोंडाळ्यात रहातात, आमदारांना भेटत नाहीत वगैरे कारणे बकवास आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा तक्रारी होत असतात. म्हणून कुणी त्यांना पदावरून हटवत नाहि. अमरिंदर यांच्यावर अकाली दलाचे बादल यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे आरोप केले जातात. त्यात मात्र तथ्य आहे. बादल यांच्या काळात पंजाब अमली पदार्थांच्या माफियांच्या ताब्यात गेले. ड्रग माफियांवर कारवाई करण्याचे आश्वासन अमरिंदर यांनी दिले होते. पण काहीच झाले नाही. याचाही फटका कांग्रेसला बसू शकतो, याची कुणकुण श्रेष्ठींना लागली असावी. आणखी काही बारीक कारणेही आहेत जी अशा वेळेस एकदम महत्वाची ठरतात. अमरिंदर यांनी सचिवालयात जाणे सोडून दिले होते. आपल्या फार्महाऊसवरूनच ते कारभार पहात. पण आता अमरिंदर यांच्या राजिनाम्यानंतर कांग्रेस आणखीच अडचणीत आली आहे. या राजकीय साठमारीमुळे मतदार पक्षापासून अधिकच दूर जाण्यिची शक्यता आहे. शिवाय अमरिंदर गट स्वस्थ बसणार नाही.  कांग्रेसला सत्तास्थापनेसाठी जागा कशा मिळणार नाहित, हे अमरिंदर गट पहाणार. भाजप आणि अकाली दल यांना जबरदस्त लाभ होण्याची शक्यता आहे. कारण अमरिंदर यांनी आपल्याकडे अनेक पर्याय असल्याचे म्हटले आहे. ते कदाचित भाजपमध्ये जातील. तसे झाले तर बुटा सिंग यांच्यानंतर दुसरे ज्येष्ठ कांग्रेस नेते ठरतील. भाजपकडे पदे देण्याच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे अमरिंदर यांना भाजपमध्ये गेल्याने फायदाच होऊ शकतो. कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षातील बंडखोरांना महत्त्व देत आहेत, हेच यावरून स्पष्ट होत आहे. अमरिंदर यांनीच पंजाबात कांग्रेसची सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राहुल गांधी तर तिकडे प्रचारासाठी फिरकलेही नव्हते. अमरिंदर यांचे बंड कांग्रेसला चांगलेच महागात पडणार आहे. सिद्धू लोकप्रिय आहेत,पण मुख्यमंत्री होण्याची त्यांची क्षमता नाहि. शिवाय ते बाहेरून आलेले आहेत. अमरिंदर हे मूळ कांग्रेसचे आहेत. याचाही विचार मतदार करतातच. भाजपला मात्र या साऱ्या घटनांमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असणार. परवा जालियनवाला बाग हत्याकांड स्थळाच्या सुशोभिकरणावरून राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टिका केली असताना अमरिंदर यांनी स्मारकाचे कौतुक केले होते. यावरून अमरिंदर हे पक्षात संतुष्ट नसल्याचे संकेत मिळाले होते. या सर्व प्रकरणाचा मतितार्थ हाच आहे की, पंजाब विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेसला पक्षातील असंतोष शमवता आला नाही तर पक्षाचा पराभव निश्चित असू शकतो. गुजरातचे माजी मुख्यमंत्री रूपानी यांना बदलल्यावर शेलकी टिका करणार्या कांग्रेसची बोलती आता बंद होईल.