शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा षण्मुखानंद सभागृहात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा षण्मुखानंद सभागृहात

मुंबई : शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क यांचे सुमारे पाच दशकांहून अधिक वर्षांचे नाते आहे. परंतु 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे सभा, संमेलनांवर बंदी आली. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील बंदिस्त सभागृहात घेण्यात आला होता. यंदा कोरोना प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला असला तरी हा मेळावा षण्मुखानंद सभागृहातच होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार असून, 50 टक्के उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईतील आमदार, महापौर आणि मुंबई महापालिकेतले काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, कोरोनाचं संकट जरासे ओसरू लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे.

शिवसेना, ठाकरे कुटुंबीय आणि दसरा मेळावा
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा 27 नोव्हेंबर 1966 रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता. तेव्हापासून याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी जवळचा संबंध आहे.  शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना युवासेनेची जबाबदारी दिली, त्याचेही हे मैदान साक्षीदार आहे. त्याचबरोबर 1995 मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला, तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

2015 साली एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनिप्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तेव्हा शिवसेनेकडून या सभेत 60 डिग्रीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही, त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या मात्र पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मात्र राज्यात युतीचे सरकार होते, त्यामुळे दसरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले.

ठाकरे कुटुंबाच्या आनंदाचे हे मैदान जसे साक्षीदार बनले, तसे 2012 साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुःखाचेही साक्षीदार बनले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर याच मैदानात अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यावेळी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक या मैदानात जमले होते.