कोव्हॅक्सिन’बाबत लवकरच निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोव्हॅक्सिन’बाबत लवकरच निर्णय

भारत बायोटेकच्या करोनावरील कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) येत्या चार ते सहा आठवडय़ांमध्ये घेण्याची शक्यता आहे, असे डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. सेंटर फॉर सायन्स ॅण्ड एनव्हायर्नमेण्टने (सीएसई) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. भारत बायोटेक ही कोव्हॅक्सिनची उत्पादक कंपनी संपूर्ण माहिती डब्ल्यूएचओच्या पोर्टलवर अपलोड करीत असल्याने डब्ल्यूएचओ कोव्हॅक्सिनचा आढावा घेत आहे, असे स्वामिनाथन म्हणाल्या. कोव्हॅक्सिनची सुरक्षितता आणि परिणामकारकता यासह उत्पादनाच्या दर्जाबाबतची संपूर्ण माहिती भारत बायोटेकने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय चार-सहा आठवडय़ांमध्ये घेण्यात येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

भारतात मृत्यूसंख्येत वाढ

भारतात गेल्या एका दिवसात ४२ हजार ७६६ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख ९५ हजार ७१६ वर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती चार लाख ५५ हजार ३३ वर पोहोचली आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत करोनामुळे १२०६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख सात हजार १४५ वर पोहोचली आहे. दिवसभरातील मृत्यूंची नोंद गुरुवारी ८१२, तर  शुक्रवारी ९११ इतकी झाली होती.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या .४८ टक्के आहे, तर  बरे होण्याचे प्रमाण ९७.२० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात शुक्रवारी १९ लाख ५५ हजार २२५ चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४२ कोटी ९० लाख ४१ हजार ९७० वर पोहोचली आहे. करोनातून आतापर्यंत दोन कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ जण बरे झाले आहेत तर मृत्युदर .३२ टक्के इतका आहे. आतापर्यंत ३७.२१ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या एका दिवसात करोनामुळे १२०६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ७३८ जण महाराष्ट्रातील आहेतआतापर्यंत एकूण चार लाख सात हजार १४५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक लाख २५ हजार ३४ जण महाराष्ट्रातील आहेत.