टोक्यो पॅरालिम्पिक : भाविना पटेलने रौप्य पदकाची कमाई टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोक्यो पॅरालिम्पिक : भाविना पटेलने रौप्य पदकाची कमाई टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू

टोक्यो,: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या भाविना पटेलने रौप्य पदकाची कमाई केली आहे. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असून शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अशी केली कामगिरी

तब्बल १९ मिनिटे चाललेल्या सामन्यात भाविनाचा सामना चीनच्या वर्ल्ड नंबर वन यिंगलाशी झाला. पण यिंगनं सलग सेटमध्ये भाविनाचा पराभव केला. यिंगनं पहिल्या सेटपासूनच भाविनावर दबाव तयार केला होता. यिंगनं पहिला सेट ११-७ अशा फरकाने आपल्या बाजूला वळवला. दुसऱ्या सेटमध्येही यिंगचे आपली कामगिरी कायम ठेवली. तिने दुसरा सेट ११-५ अशा फरकानं आपल्या नावे केला. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीपासूनच भाविना वापसी करण्याच्या प्रयत्नात होती. परंतु, यिंगने तिसरा सेटही ११-६ अशा फरकाने जिंकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

भाविनाचा पॅरालिम्पिकमधील प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला. तिने आपल्या उत्तम कामगिरीने सर्वांच्याच मनात वेगळे स्थान निर्माण केले. जागतिक क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर असणारी भाविनाने अनेक दिग्गज खेळाडूंवर मात केली. प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये भाविनाने आठव्या क्रमांकावरील खेळाडूवर मात करत विजय मिळवला.

भाविनानं क्वॉर्टर फायनल्समध्ये रियो पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदकवीर आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव केला. चीनची स्टार खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूचाही भाविनाने सेमी फायनल्समध्ये दणदणीत पराभव केला.

भाविनाने सेमी फायनलमध्ये जागतिक तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू असलेल्या मियोचा पराभव केला. तिने हा सामना ३-२ (७-११, ११-७ ११-४, ९-११, ११-८) असा जिंकला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

पोलिओ असतानाही केली मात

१३ वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबादमधील वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. ती व्हीलचेअरवर बसून खेळते. १२ वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता तिने दमदार वाटचाल केली आहे.

२०११ मध्ये भाविनाने थायलंड येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. २०१३ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले होते. भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला असून पदकांची कमाई केली आहे.