‘‘ते भारतीय संघाबद्दल कधीही…”, गावसकरांनी केली ब्रिटीश मीडियाची बोलती बंद!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘‘ते भारतीय संघाबद्दल कधीही…”, गावसकरांनी केली ब्रिटीश मीडियाची बोलती बंद!

भारत आणि इंग्लंड दरम्यानची पाचवी कसोटी खेळली जाऊ शकली नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि बीसीसीआय या कसोटीचे पुन्हा आयोजन करण्यासाठी चर्चा करत आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडूंना अंतिम कसोटी खेळायची इच्छा नसल्याच्या अनेक बातम्या इंग्रजी माध्यमांनी दिल्या. पण भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी हे आरोप सरळ फेटाळले आणि इंग्रजी वृत्तपत्रांना खडे बोल सुनावले आहेत. पुराव्याशिवाय असे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टीम इंडिया मालिकेत २-१ ने पुढे होती.

स्पोर्ट्स तकशी बोलताना गावसकर म्हणाले, ”आमच्या खेळाडूंनी मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. मँचेस्टरमध्ये गोलंदाजांना मदत मिळते. मग त्यांना खेळायचे का नाही? भारतीय खेळाडूंना शेवटची कसोटी खेळायची इच्छा नव्हती, यावर माझा विश्वास नाही. कोणत्याही पुरावाशिवाय तु्म्ही आरोप करू नये असे मला वाटते. ” २००७नंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही करोना प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप होता. शास्त्री व्यतिरिक्त तीन सपोर्ट स्टाफ पॉझिटिव्ह आढळले. याबाबत गावसकर म्हणाले, ”पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमामुळे शास्त्री पॉझिटिव्ह आढळले, हे कोणाला कसे कळेल? कार्यक्रमानंतर जेव्हा खेळाडूंची चाचणी घेण्यात आली तेव्हा सर्व निगेटिव्ह होते. इंग्रजी माध्यमे भारतीय संघाबद्दल कधीही काही चांगले बोलणार नाहीत किंवा लिहिणार नाहीत; ते त्यांना नेहमी जबाबदार धरतील. प्रथम त्यांनी सत्य शोधले आणि मगच बोलले पाहिजे.”

साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांच्या करोना चाचणीचा अहवाल गुरुवारी सकारात्मक आल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी निर्णायक कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. कसोटीच्या आदल्या दिवशी परमार यांनाही करोनाची लागण झाली. भारताचे खेळाडू त्यांच्या संपर्कात होते.