जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जगमोहन मृत्यूसमयी 94 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय.

शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या जगमोहन यांना सेवानिवृत्तीनंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनवण्यात आले. त्यांनी 1984 ते 1989 आणि जानेवारी ते मे 1990 असे दोन वेळा काश्मीरचे राज्यपालपद भूषविले होते. तसेच गोवा आणि दिल्लीचे उपराज्यपाल म्हणूनही जगमोहन यांनी काम केले होते. त्यासोबतच अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणूनही जगमोहन यांनी काम केले होते. काश्मीरचे राज्यपाल असताना जगमोहन यांनी कठोर निर्णय घेतले होते. दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणारे राज्यपाल म्हणून त्यांचा लौकिक होता. जगमोहन यांच्या कठोर निर्णयांमुळे काश्मिरातील स्थानिक नेत्यांनी दिल्लीच्या मदतीने त्यांना राज्यपाल पदावरून हटवले होते. केंद्र सरकारने जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 हटवल्याचा जगमोहन यांना खूप आनंद झाला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी जगमोहन यांच्याशी संपर्क करून चर्चा केली होती. दरम्यान जगमोहन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी ट्वीटरवर संदेश जारी करून शोक व्यक्त केलाय