पालिकेच्या चार नव्या जम्बो करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पालिकेच्या चार नव्या जम्बो करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग!

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चार नवीन जम्बो रुग्णालय उभारताना ही
रुग्णालये एक वर्षाहून अधिक काळ टिकतील अशी त्याची रचना असणार आहे. तसेच या सर्व
रुग्णालयात लहान मुलांसाठी किमान ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून
आवश्यकतेनुसार २५० खाटा करता येतील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी
सांगितले.
मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा
सामना करण्यासाठी पालिकेने जम्बो रुग्णालयांची क्षमता वाढविण्याचा तसेच बळकटीकरणाचे
काम हाती घेतले आहे. आजघडीला पालिकेच्या आठ जम्बो करोना रुग्णालयात मिळून १०,८३०
खाटा आहेत. यात अतिदक्षता विभागात ८७२ तर व्हेंटिलेटरच्या ५७४ खाटा आहेत. आजपर्यंत
एक लाख नऊ हजार रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले असून ही जम्बो रुग्णालये उभारताना
साधारणपणे सहा महिने कालावधीचा विचार करून उभारण्यात आली होती. अलीकडे झालेल्या
दोन चक्रीवादळानंतर या आठही जम्बो करोना रुग्णालयांच स्ट्रक्चरल ऑडिट तसेच फायर
ऑडिट करून नव्याने मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात बीकेसी, नेस्को टप्पा एक
व दोन, दहिसर येथील दोन, नेस्को, डोम, मुलुंड व सेव्हन हिल्सचा समावेश आहे. आता नव्याने
मालाड, कांजुरमार्ग, सायन व महालक्ष्मी येथे जम्बो रुग्णालये उभारण्यात येत असून याठिकाणी
७० टक्के ऑक्सिजन खाटा व १० टक्के अतिदक्षता विभागासाठी खाटा राखीव ठेवण्यात येणार
असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग या सर्व ठिकाणी करण्यात येणार असून सुरुवातीला २५ ते ५०
खाटांची व्यवस्था येथे केली जाणार आहे. या मुलांसाठी लागणारी उपकरणे खरेदी केली जातील.
आवश्यकता भासल्यास याच ठिकाणी २५० खाटांची व्यवस्था होऊ शकेल. त्यासाठी आवश्यक ती
रचना तेथे करण्यात येईल, असेही सुरेश काकाणी म्हणाले.