तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणात सध्या आणखी एका ठाकरेंची चर्चा आहे ते म्हणजे तेजस ठाकरे. लवकरच तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार अशी चर्चा सुरु आहे. यामागील कारण म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्रात तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छापून आलेली जाहिरात आहे. या जाहिरातीमुळे तेजस ठाकरेदेखील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशांसंबंधी विचारण्यात आलं.

त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “ठाकरे कुटुंबातून कोणी राजकारणात येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. बाळासाहेबांचा आवाज आणि करारीपणा यांनी तरी घ्यावा अशी अपेक्षा आहे. अगोदर थोडा अपेक्षाभंग झाला होता, पण लहान भाऊ तरी पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “तुलना का केली हे त्यांनाच विचारा. भावाला शुभेच्छा दिल्यात की भावांमध्ये वाद निर्माण केला हेच कळत नाही”.