मुंबईकरांसाठी धावून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे मंत्री अनिल परब यांच्याकडून कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईकरांसाठी धावून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे मंत्री अनिल परब यांच्याकडून कौतुक

मुंबई : कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेली एसटीची सेवा रविवार १३ जून पासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतानाही मुंबईकरांच्या सेवेसाठी धावून आल्याबद्दल मंत्री अॅड. परब यांनी एसटीच्या चालक-वाहकांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले.  

 

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतूकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स प्रमाणे एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता.

 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी राज्यातील विविध आगारातील सुमारे चार हजार चालक वाहक मदतीला धावून आले होते. मुंबईतील रस्त्यांची माहिती नसतानाही त्यांनी अगदी कौशल्यपूर्ण आपले कर्तव्य पार पाडले. सर्वसामान्यांठी लोकल सेवा बंद असतानाही एसटीच्या सेवेमुळे अनेकांचा प्रवास सुखकर झाल्याने प्रवाशांनी एसटीचे कौतुकही केले. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्यांच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून टप्याटप्प्याने बसेस बंद करण्यात आल्या

 

 बेस्टवर प्रवाशांचा भार वाढून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे पालघर आगारातील बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत होत्या. परंतु, बेस्टने आवश्यकता नसल्याचे कळविल्याने उर्वरीत बसेसही बेस्टच्या सेवेतून बंद करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री अॅड. परब यांनी दिली

 

 एसटीच्या चालक-वाहकांच्या आरोग्याचा विचार करत मंत्री, ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या वर्धापनदिनी (१जून रोजी) बेस्टच्या सेवेतून सर्व बसेस बंद करीत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बेस्टच्या सेवेतून उर्वरित सर्व एसटीची सेवा आज रविवार पासून बंद करण्यात येत आहे. परगावातून मुंबईत येत येथील परिस्थितीशी जुळवून घेत वेळप्रसंगी अडी-अडचणीवर मात करत मुंबईकरांसाठी सेवा देणाऱ्या चालक, वाहक व्यवस्थेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे मंत्री परब यांनी आभार मानले. तुमच्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळेच एस. टी.चा मान विश्वास वाढतो, असे कौतुकौद्गारही त्यांनी यावेळी काढले.