मुंबईत चार मजली इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत चार मजली इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जखमी

मुंबई  : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळली‌. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर १७ जण जखमी झाला आहे. दरम्यान युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मालाडमधील मालवणी गेट क्र. येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीजखमींना शताब्दी आणि बीडीबीए रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवळपास १६ जणांना बाहेर काढण्यात आले. ज्यामध्ये तीन लहान मुले, तीन महिला आणि १० पुरुषांचा समावेश होता. खबरदारी म्हणून इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत बचावकार्य सुरू आहे

 

सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर

 

मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान येथील सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची या बांधकामांना परवानगी होती का आणि या धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

पालकमंत्री अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख रात्रीच घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरू होते.