वीज देयकांचे साडेदहा हजार धनादेश दरमहा परत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वीज देयकांचे साडेदहा हजार धनादेश दरमहा परत

पुणे : करोनाच्या कालावधीत वीज देयकांची थकबाकी वाढल्याने अडचणीत असलेल्या महावितरणसमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे. देयकांपोटी ग्राहकांकडून जमा केले जाणारे धनादेश बँकेतून परत येण्याचे (बाउन्स) प्रकार राज्यात वाढले असून, सध्या दरमहा दहा ते साडेदहा हजार धनादेश विविध कारणांनी परत येत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक वीज देयकांसाठी बिलंब आकार आणि जीएसटीसह ८८५ रुपयांचा दंड केला जात आहे. हा दंड पुढील वीज देयकात इतर आकार म्हणून समाविष्ट केला जात आहे.

वीज देयकांचा भरणा करण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध असतानाही राज्यात अद्यापही साडेचार लाखांहून अधिक ग्राहक देयकांचा भरणा करण्यासाठी धनादेश देत आहेत. त्यात पुणे परिमंडलातील १ लाख ८ हजार, भांडूप परिमंडलातील १ लाख ४ हजार, कल्याण परिमंडलातील ७३ हजार तसेच नाशिक, कोल्हापूर, बारामती, नागपूर परिमंडलातील २४ ते २९ हजार ग्राहकांचा समावेश आहे. धनादेश बँकेतून परत येण्यात पुणे आणि भांडूप परिमंडलातून दरमहा सुमारे १७०० ग्राहकांचा समावेश आहे. नागपूर १००, तर बारामती परिमंडलातून दरमहा सुमारे ९०० धनादेश परत येत आहेत.

धनादेश परत येणाऱ्या सर्व ग्राहकांच्या पुढील देयकामध्ये दंडाची रक्कम समाविष्ट केली जाते. हा दंड टाळण्यासाठी सोपा पर्याय असलेल्या ऑनलाइनद्वारे देयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे चालू, मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा भरणा लघुदाब वीजग्राहकांना घरबसल्या करता येतो.  त्यासाठी देयकामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता सर्व ऑनलाइनद्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती किंवा सोसायटय़ांच्या वीजग्राहकांचे देयक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएसकिंवा एनईएफटीद्वारे थेट देयक भरण्याची सोय उपलब्ध आहे.