तालिबानचा धोका पुन्हा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानचा धोका पुन्हा

अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व पुन्हा वाढत आहे आणि सार्या वायव्य प्रांताच्याच नव्हे तर आशियासाठी ही चांगली बातमी नाहि. कारण तालिबानने पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा करण्याचे गंभीर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून अफगाणिस्तानात पुन्हा शरियत लागू करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. एका महिलेला केवळ घट्ट कपडे घातले म्हणून तालिबान्यांनी सरळ तिला कत्तल करून ठार मारले. भारतात आणि इतर देशांत सहिष्णुता आहे म्हणून महिला ब्रा वापरायची की नाहि, यावर नाहक चर्चा करत असतात. केवळ तंग कपडे घातले म्हणून तालिबानी महिलेची हत्या करू शकतात. सहिष्णुता असलेल्या देशात असे प्रकार चालू शकतात. तालिबान किंवा पाकिस्तानात असे प्रकार चालत नाहित. ते असो. पण तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या बहुतेक प्रांतांवर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना त्यात यश मिळत आहे. आधुनिक जगाच्या दृष्टिने हे काही चांगले नाहि. अफगाणिस्तानच्या भूमीवर जेव्हा तालिबान्यांची वक्रदृष्टी पडली नव्हती तेव्हा अफगाण महिलाही आधुनिक वेषभूषा करत असत आणि बाहेरच्या देशांत अगदी केंब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असत. तालिबान्यांच्या राजवटीने त्यांना मध्ययुगात लोटले. या धोक्यापेक्षा तालिबानी प्रबळ होणे हे भारतासाठी अत्यंत अशुभ आहे. कारण हे तालिबानी पाकिस्तानातील दहशतवादी गटांना मदत करून भारतावर हल्ले घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. पाकिस्तान तालिबान्यांना अफगाणिस्तानात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मदत करत आहे, हे जास्त वाईट आहे. त्यामुळे भारताला असलेला धोका चार पटींनी वाढला आहे. पण भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने अफगाणिस्तानात तालिबानचे हल्ले तीव्र झाले असून त्याविरोधात आंतरराष्ट्रीय सहमती तयार करण्यात भारताला अपयश आले. ही जास्त गंभीर गोष्ट आहे. पाच सदस्यराष्ट्रांच्या गटात तालिबानवर कारवाई करण्यावर एकमत झाले नाहि. महत्वाकांक्षी चिनला आपले प्रादेशिक महत्व वाढवण्यासाठी तालिबानचे नियंत्रण अफगाणिस्तानात प्रस्थापित करायचे आहे आणि संधिसाधू रशिया चिनच्या मागे आहे. तर अमेरिकेचे अफगाणिस्तानातील लष्करी अस्तित्वामुळे चांगलेच हात पोळले आहेत. त्यामुळे अमेरिका आता अफगाणिस्तानात पाय टाकणार नाहि. त्यामुळे अमेरिकेचा महत्वाचा आधार आता नाहि. फ्रान्समध्येही मध्य पूर्व आशियात पाश्चिमात्य हस्तक्षेपाला असलेला पाठिंबा कमी होत आहे. तर इंग्लंडच्या लष्कराचे पाकिस्तानी लष्कराशी खास संबंध आहेत. पाकिस्तान आणि तालिबान यांचा दुटप्पीपणा सार्या जगासमोर उघड झाला आहे. ते तोंडाने शांतिच्या गोष्टी करतात आणि प्रत्यक्षात युद्धखोरीला प्रोत्साहन देतात. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानात तालिबानींकडून होत असलेल्या मानवाधिकाराच्या भंगाबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला. इतका मोठा आक्रमक हल्ला करण्याची तालिबानची ताकद नाहि. अफगाणिस्तानात दहा हजार परदेशी लढाऊ सैनिक असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. पाकिस्तानी लष्कर तालिबान्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. याचा फटका आज नाहि तरीही भविष्यात भारताला बसणार आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती कधी नव्हे इतकी गंभीर आहे. चिन, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका अशा देशांनी भारत वेढला आहे. भारताने फार सावध राहिले पाहिजे. तालिबानींची वक्रदृष्टि भारतातील कश्मिरवर वळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच अफगाणिस्तानला पुन्हा उभे करण्यात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. त्यामुळे तालिबान्यांचा भारतावर विशेष राग आहे. त्याचा बदला घेण्यासाठी ते उत्सुक असतील. भारतासाठी रात्र आणि दिवस दोन्ही वैर्याचे आहेत.