पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रि शाह मेहमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानच्या एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बरेच अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांना चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात. अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेल्या उच्च प्रतिच्या हिंसाचाराबद्दल त्यांनी तालिबानला दोषमुक्त केले आहे. आणि भारतावर आरोप केले आहेत. अफगाण भूमीवरून भारत हिंसक कारवाया करत असल्याचा तद्दन खोटा आरोप त्यांनी केला आहे. ज्या पाकिस्तानला सारे जग दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून ओळखते, त्याने असे आरोप करावेत, यासारखे हास्यास्पद आणि संतापजनक दुसरे काहीही नाहि. पाकिस्तानात बसून अनेक दहशतवाद्यांनी भारतात आजवर कित्येक दहशतवादी कारवाया केल्या, मुंबईवर दहशतवादी हल्ला केला, बाँबस्फोट मालिका घडवल्या आणि त्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रि असे म्हणतात की भारत अफगाणिस्तानातून हिंसक कारवाया करत आहे. भारतातूनही आता त्यांना समर्थन देणारे अभिनेत्री स्वरा भास्कर, इतर काही स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे डावे महाभाग आणि काही काँग्रेसवालेही निघतील. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी त्यांचे हे मत असेल, हे उघड आहे. पण सुदैवाने त्यांची संख्या थोडी आहे. परंतु चिंताजनक हे आहे की पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानला क्लिन चिट कशाच्या आधारावर दिली, याचा काहीही खुलासा केलेला नाहि. कुरेशी यांच्या या वक्तव्यामागे एक कारण आहे आणि ते आहे अफगाणिस्तानने पाकिस्तानवरच तालिबानच्या हिंसाचारास मदत केल्याचा आरोप केला आहे. त्याहीपेक्षा अफगाण शांतता प्रक्रियेत भारत हा अफगाणिस्तानचे भविष्य घडवण्यात महत्वाचा घटक आहे, यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. यामुळे पाकिस्तानची पुरती बेअब्रु झाली आहे. तालिबानला शांतता चर्चेच्या टेबलवर आणण्यात पाकिस्तानइतकीच भारतानेही भूमिका बजावली आहे. आणि भारताला अमेरिका महत्व देत असेल तर त्याप्रमाणात पाकिस्तानचे महत्व कमी होत जाणार आहे. तालिबानला चर्चेसाठी आपणच चर्चेच्या टेबलवर आणल्याचे संपूर्ण श्रेय पाकिस्तानला हवे आहे. कारण त्यानिमित्ताने अमेरिकेकडून आणखी मदत उकळता येऊ शकते. पण आता त्यात भारताचे परराष्ट्रमंत्रि जयशंकर यांनी अमेरिकेचा दौरा करून त्यांना वस्तुस्थिती समजावून दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या डावपेचात मिठाचा खडा पडला आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी मुद्दाम भारतावर हिंसाचार फैलावल्याचा आरोप केला आहे. भारताने युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानची फेर उभारणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानात भारतीय कंपन्यांचे  कित्येक कोटी रूपयांचे प्रकल्प सुरू आहेत. पाकिस्तान हे काहीच करू शकत नसल्याने केवळ जगात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु पाकिस्तान हाच दहशतवादी कारवायांना आसरा देणारा देश आहे, हे जगाला ठाऊक असल्याने कुरेशी यांच्या आरोपांनी काहीही फरक पडणार नाहि. अजून भारताने अधिकृतपणे कुरेशी यांच्या आरोपांचे खंडन केले नाहि. परंतु ते केले जाईल. खरेतर ही पाकिस्तानने भारताची केलेली राजनैतिक आगळीकच आहे. पाकिस्तानला खोटे आरोप करण्याची सवय आहे आणि भारताला त्याचा कित्येक वेळा अनुभव आला आहे. अजूनही मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केलेले नाहि. त्यामुळे कुरेशी यांच्या आरोपांना फार महत्व देण्याची गरज नाहि. मात्र खुद्द अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विश्वास राहिलेला नाहि. अफगाणिस्तानने तर पाकिस्तान हे वेश्यागृह असल्याचा आरोप केला आहे. त्यावर कुरेशी यांनी काहीही भाष्य न करता भारतावरच आरोप करून विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हे पाकिस्तानच्या खोटेपणावर नेहमीच आधारलेले राहिलेले आहे. जम्मू आणि कश्मिरला स्वायत्तता देणारे कलम तीनशे सत्तर रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जास्तच जळफळाट झाला आहे. तेव्हापासून पाकिस्तान भारताची आगळीक काढण्याच्या संधीच्या शोधात आहे. दहशतवादी कारवाया आता करू शकत नाहि कारण सार्या जगाची नजर आता पाकिस्तानवर आहे. आणि त्याला क्लिन चिट देण्यासाठी अमेरिका आता तयार नाहि. कारण शीतयुद्धकाळात अमेरिकेला पाकिस्तानची राजनैतिक गरज होती. आता तशी राहिलेली नाहि आणि भारताच्या आर्थिक प्रगतिमुळेही भारताची विशाल बाजारपेठ अमेरिकेला आजही खुणावत आहे. कोरोना पश्चात काळात सर्वच देशांचे सारेच आर्थिक गणित कोसळले आहे आणि प्रत्येकाला भारताची विशाल बाजारपेठ हवी आहे. त्यामुळे भारताला दुखावून चालणार नाहि, हे प्रत्येक महत्वाकांक्षी देशाला ठाऊक आहे. त्यामुळे कुरेशी यांच्या आरोपांना कुणीही बाहेरचा देश पाठिंबा देण्याची शक्यता नाहि. भारताचे शेजारी देशही आता चिनपासून सावध झाले आहेत. नेपाळने भारताशी मध्यंतरी बिघडलेले संबंध पुन्हा रूळावर आणले आहेत. त्यामुळे कुरेशी यांच्या आरोपांना आशियातूनही पाठिंबा मिळणार नाहि. कुरेशी यांच्या आरोपांमागे पाकिस्तानची आर्थिक डबघाईला आलेली स्थिती, मागासलेपणा आणि दहशतवादी गटांना मदत करणारा देश म्हणून बसलेला अघोषित  शिक्का इतकी कारणे आहेत. प्रचंड वैफल्याच्या भावनेतून कुरेशी यांनी हे आरोप केले आहेत. अंतर्गत राजकारण काहीही असो, भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच मजबूत पायावर आधारलेले आहे. त्यामुळे कुरेशी यांच्या आरोपांनी काहीही फरक पडणार नाहि.