पुण्यातील दुकानांच्या वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ - अजित पवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुण्यातील दुकानांच्या वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ - अजित पवार

पुणे - राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत असल्यामुळे अनेकांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबतचा विचार आम्ही देखील करत आहोत, मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करीत आहोत. त्याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर आणि जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यानंतर राज्यातील एकूणच परिस्थितीची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर ३.९ टक्के एवढा असून मृत्यू दर १.६ टक्के एवढा आहे. त्यामुळे आपण लेव्हल तीनमध्ये येत आहोत. तसेच येत्या काळात येणार्‍या तिसर्‍या लाटेचा विचार करता, सर्व तयारी करण्यात आली आहे. पण तिसरी लाट येऊच नये, अशी आमच्यासह सर्वांची भावना आहे. पण तरी देखील पुढील धोके लक्षात घेऊन, प्रशासन सज्ज आहे.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. तरी देखील मागील दरवाजाद्वारे दुपारनंतर दुकाने सुरू असतात हे सांगण्यात आले आहे. एका बाजूला बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे, व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत सर्वांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, सोमवारपासून सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि हा निर्णय सकारात्मक असेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.