मोदी ठाकरे भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मोदी ठाकरे भेट

मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांनी अचानक पंतप्रधान मोदी यांची दहा मिनिटे वैयक्तिक भेट घेतली, याला खूप राजकीय अर्थ आहे. मोदी आणि ठाकरे यांचे काही शत्रुत्व नाहि, असे ठाकरे सांगत आहेत. मोदी खुद्द याबाबत कधीही काहीही बोलत नाहित.   मात्र ते ठाकरे यांच्यावर उघड टिका करत नाहित.  राज्यातील भाजप नेत्यांना धाक घालण्यासाठी कदाचित ठाकरे असे वक्तव्य करत असावेत. परंतु मोदींनी त्यांना वैयक्तिक भेट दिली आणि बंद दाराआड चर्चा केली, हे मात्र सत्य आहे. यातून अपेक्षेप्रमाणे पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येणार का, सर्वात मोठा कळीचा प्रश्न चर्चिला जात आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार आहोत. असे वक्तव्य केले आहे, त्याकडे या पार्श्वभूमीवर पहायला हवे. पण भाजप आणि शिवसेना यांच्यातील अलिकडचे विखारी शत्रुत्व आणि एकमेकांवर केलेली जहाल टिका यामुळे ही युती पुन्हा होईल, असे वाटत नाहि. पाटील काहीही बोलोत. त्यांना त्यांच्या पक्षातही कुणी गांभिर्याने घेत नाहित. शिवाय देवेंद्र् फडणवीस यांना शह देण्यासाठीही त्यांनी असे वक्तव्य मुद्दाम केले असण्याची शक्यता आहे. परंतु ठाकरे यांनी मोदी यांच्या घेतलेल्या भेटीत नक्की काय विषय चर्चिले गेले असावेत, यावर काही सूचित करता येईल. दोन्ही नेते दिल्ली आणि मुंबईच्या हवामानावर किंवा एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी निश्चितच भेटले नाहित, हे तर उघड आहे. राज्यात भाजपने विशेषतः शिवसेनेला लक्ष्य केले आहे. गद्दार म्हणून शिवसेनेला हिणवले जात आहे. त्यामुळे ठाकरे अस्वस्थ झाले असावेत. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांना  समज देण्यासाठीही ठाकरेंनी गळ घातली असल्याची शक्यता आहे. अर्थात मोदी असे काहीही करणार नाहित. परंतु राज्यातील भाजप नेते अस्वस्थ झाले असतील. भाजपने शिवसेनेवर जी विखारी टिका केली आहे, ती शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. तिची धार येत्या काही दिवसात कमी झाली तर मोदी आणि ठाकरे यांच्या भेटीत काय झाले, ते आपोआप समजून जाईल. कोरोनाच्या संकटकाळात निदान मोदी तरी आपल्या पाठिशी असावेत, ही ठाकरेंची इच्छा असू शकते. मात्र मोदींनी जर ठाकरेंचे ऐकून राज्यातील नेत्यांना फार आक्रमक धोरण घेऊ नका, असा सल्ला दिला तर खुद्द भाजप अडचणीत येईल. पुढल्या वर्षी मुंबई पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात भाजपने सौम्य भूमिका घेतली तर शिवसेना पालिका टिकवेल आणि मग भाजपची विश्वासार्हता लयास जाईल.  इतकेच नव्हे, तर या परिस्थितीत खुद्द मोदीं अडचणीत येऊ शकतात. कारण कोरोना संकट काळात मोदींविरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भाजपला फटका बसू नये, म्हणून संघ विचार करू शकतो. अर्थात ही फार दूरची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप यांची काही तडजोड झालीच तर ती थेट मोदींच्याच पातळीवर व्हायला हवी, असाही इषारा ठाकरेंनी दिलेला असू शकतो. परंतु त्यातून काही निष्पन्न होणार नाहि. कारण मोदी काही युतीची बोलणी करणार नाहित. त्यासाठी फडणवीस, तावडे, आशिष शेलार, मुनगंटीवार आणि पाटील हीच फळी काम करणार आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा प्रयत्न वायाच जाईल. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय होती. पवारांच्या प्रकृतीची चौकशी करणे हे निमित्त होते. पवार फडणवीस भेटीने ठाकरे अस्वस्थ झाले असावेत. कारण भाजप राष्ट्रवादी असे समीकरण जुळलेच तर त्यात शिवसेनेला स्थानच उरणार नाहि. आज शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की तिला सत्तेपासून दूर रहाता येणारच नाहि. कारण सत्ता गेली की अनेक प्रकरणे निघणार आणि न्यायालयात हेलपाटे घालत बसावे लागणार. कोणत्याही परिस्थितीत आणि कुणाशीही जुळवून घेत आता शिवसेनेला पुढची वाटचाल कायम करावी लागणार आहे. स्वबळावर सत्ता मिळवत नाहि तोपर्यंत.  शिवसेना विरोधी पक्षात राहून काम करू शकत नाहि. शिवाय गेल्या भाजपच्या सत्तेच्या काळात शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावली, ती राज्यातील भाजप नेते लक्षात ठेवतील. चंद्रकांत पाटील हे कदाचित अपवाद असतील. पण फडणवीस विसरणार नाहित. मोदी आणि ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे, हे निश्चित आहे. त्यातच आज फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रिय मंत्रि रामदास आठवले यांनी पवारांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. ही भेटही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आठवले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेतल्याचे म्हटले असले तरीही असल्या वक्तव्यांत काहीही अर्थ नसतो, भेटी राजकीय अर्थानेच होत असतात. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल हे प्रथमपासूनच  भाजपबरोबर राष्ट्रवादीने जायला हवे, या मताचे आहेत. त्यांनीही गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यामुळेही ठाकरे हादरले असावेत. अर्थात मोदींच्या मनात काय आहे, हे कुणीच सांगू शकत नाहि. त्यामुळे नजिकच्या काही दिवसात एखादी मोठी राजकीय उलथापालथ घडण्याची दाट शक्यता आहे. तीवर नजर ठेवणे आवश्यक आहे.