केरळ, तामिळनाडूला ऑरेंज अ‍ॅलर्ट, गंभीर पूरस्थितीचा धोका!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

केरळ, तामिळनाडूला ऑरेंज अ‍ॅलर्ट, गंभीर पूरस्थितीचा धोका!

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर Tauktea Cyclone चा धोका वाढू लागला आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले असून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commissione) यासंदर्भात दोन्ही राज्यांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा जल आयोगाकडून देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी केरळमधील मनिमला आणि अकानकोविल तर तामिळनाडूमधील कोडईयार या तिन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्याही वर वाहात आहेत. त्यामुळे केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांनी किनारी भागामध्ये सतर्कतेचे आदेश दिले असून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील स्थानिक प्रशासनाला सतर्क आणि तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी रात्री भारतीय हवामान विभागाने लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच, पुढच्या १२ तासांमध्ये हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करेल, असं देखील सांगण्यात आलं होतं. शनिवारी सकाळपासूनच तौते चक्रीवादळानं आपली मार्गक्रमणा त्या दिशेने सुरू केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.