रजनी पाटील यांच्या विजयाचा अर्थ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रजनी पाटील यांच्या विजयाचा अर्थ

दिवंगत राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे अटळ ठरलेल्या राज्यसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील यांचा विजय सोमवारी निश्चित झाला. भाजपने आपला उमेदवार देऊ नये, ही काँग्रेसने केलेली विनंती मान्य केली. त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेतला आणि पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दिवंगत खासदाराच्या जागी सहसा उमेदवार दिला जातो तेव्हा ती निवडणूक बिनविरोध व्हावी, असा संकेत आहे. त्याचे तंतोतंत पालन भाजपने केले. सहसा अशा ठिकाणी विरोधी पक्ष आपला उमेदवार देत नसतो. अर्थात याला बरेच अपवादही आहेत. उदाहरणार्थ, वांद्रे पूर्व येथील शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे २०१५ मध्ये निधन झाले. तेव्हा लगेच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत या उमेदवार होत्या. परंतु खुद्द काँग्रेसनेच हा संकेत पाळला नाहि आणि माजी मुख्यमंत्रि नारायण राणे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले. पण राणे यांचा पराभव तृप्ती सावंत यांनी केला. तेव्हा राणे हे काँग्रेसमध्ये होते. असे काही अपवाद वगळले तर सहसा दिवंगत नेत्याच्या जागी होणार्या पोटनिवडणुकीत सहसा उमेदवार दिला जात नाहि. काँग्रेस आणि भाजप यांच्यात खरेतर आडवा विस्तव जात नाहि. दोन्ही पक्षांचे नेते राष्ट्रीय स्तरावर एकमेकांचे प्रखर शत्रु आहेत. नैसर्गिक शत्रु आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात काही दिलजमाई झाली, हे क्वचित पहायला मिळणारे दृष्य सोमवारी दिसले. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे महसूलमंत्रि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांन गळ घातली होती. फडणवीस यांनी त्यांची अट मान्य करताना भाजपच्या निलंबित १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची अट घातली होती. आता काँग्रेसने ही अट मान्य केल्यावरच भाजपने पाटील यांच्या निवडीचा मार्ग मोकळा केला का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहि. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एक जोरदार संदेश काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही दिला आहे. सध्या काही काळापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जरा जास्तच जवळ येत चालले आहेत. राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप झाले तर त्या पक्षापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत हेच पुढे येऊन आपली तलवार चालवत असतात. त्यामुळे ते नेमके शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादीचे आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात असतो. काँग्रेसवर पवार यांनी नुकतीच जोरदार टिका करताना काँग्रेसची अवस्था उत्तरप्रदेशातील दिवाळखोर जमिनदारासारखी झाली आहे, असे म्हटले होते. म्हणजे तो जमिनदार समोरची भरपूर शेतजमिन आपली होती, असे सांगत असतो, असे पवारांचे म्हणणे होते. ही टिका काँग्रेसच्या जिव्हारी लागली होती. तसेच यावर पवारांनी काही खुलासा करण्याआधीच राऊत यांनी परस्परच खुलासा करून टाकला. पटोले यांनी आमचा पक्ष जमिनदारांचा नाहि, असे सांगत पवारांना जोरदार टोलाही लगावला होता. राऊत यांनी वारंवार यूपीएचे नेतृत्व पवारांनी करावे, असे सुचवले आहे. त्यांनी तसे सुचवले याचा अर्थ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना एकप्रकारे आव्हानच होते. तसेच शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी नुकतीच पवारांवर टिका केली तेव्हाही राऊत यांनी आपल्याच पक्षाच्या माजी खासदाराचे मत हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे सांगत सावरण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटनांवरून महाविकास आघाडीत काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दुय्यम वागणूक देत असल्याच्या आरोपांना बळकटी मिळाली होती. यापूर्वीही काँग्रेसच्या मागण्यांकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केले आहे. मग ते वाढीव विजेची बिले माफ करण्याचा प्रश्न असो वा अन्य काँग्रेसच्या मंत्र्यांना महत्व देण्याचा असो. हे सगळे इतके सांगण्याचे कारण इतकेच की, यामुळे दुखावलेल्या काँग्रेसने भाजपला गळ घातली आणि भाजपने चाणाक्षपणे काँग्रेसची अवघड अवस्था ओळखून तिची मागणी मान्यही करून टाकली. काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला असता तर काँग्रेसचे महत्व आणखी कमी झाले असते. शिवाय काँग्रेसचा आपल्याच आघाडीतील सहकार्यांवर विश्वास नाहि की काय, असेही यानिमित्ताने स्पष्ट झाले असते. भाजपने ही सारीच अडचण दूर केली. काँग्रेस आणि भाजप हे एकत्र तर कधीच येऊ शकणार नाहित. कारण ते नैसर्गिक शत्रु आहेत. पण काँग्रेस आणि भाजप एकमेकांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेला धडा शिकवतील, असे संकेत यातून मिळत आहेत. फडणवीस यांनी धूर्तपणे या संधीचा फायदा घेतला आहे. सध्या महाविकास आघाडीत मतभेद जास्तच प्रखर झाले आहेत. केवळ सत्ता हातची जाऊ द्यायची नाहि, यामुळे हे कोणतीही वैचारिक सुसंगति नसलेले पक्ष एक येऊन सरकार बनवून बसले आहेत. त्यातही काँग्रेसची अवस्था खरेतर लिंबू टिंबूसारखी आहे. सारी महत्वाची खाती तर राष्ट्रवादीकडे आहेत. रोज मंत्र्यांची नवनवी प्रकरणे समोर येत चालल्याने आघाडीत अस्वस्थता आहे. फरार झालेले अनिल देशमुख, अनिल परब, ईडीने छापे घातलेले शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यामुळे दोन्ही पक्ष बदनाम झाल्याचे चित्र दिसते. त्याचा फटका आपल्याला निवडणुकीत लागू नये, म्हणून काँग्रेस दूर दूर राहू पहात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सलोख्याचा हा निर्णय भविष्यातील एका नव्याच समीकरणाची नांदी ठरेल की काय, असे वाटत आहे. रजनी पाटील यांच्या विजयाचा हाच अर्थ आहे.