चक्रीवादळ काळात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

चक्रीवादळ काळात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या १८ मेपर्यंत येणार असलेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी त्याबाबतचे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.  येत्या १६ आणि १७ मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या आसपासच्या गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील वीज जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक इतके मेणबत्ती, आगपेटी बॉक्स, केरोसीन, टॉर्च, बॅटरी इत्यादी साहित्य तयार करून ठेवावे. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून आणि तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास आणि घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडून घ्यावीत. आवश्यक रेशनची व्यवस्था करून ठेवावी. संकटकालीन वापराकरिता कोरडे आणि खराब न होणारे खाद्यपदार्थ खबरदारीचे उपाय म्हणून तयार ठेवावेत. लहान मुले, वृद्ध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा. ग्राम कृती दल आणि ग्रामपंचायतींनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ आणि त्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबत दवंडी, रिक्षा फिरवून, सोशल मीडियाचा वापर करून प्रचार-प्रसिद्धी करावी. गावस्तरावर जेसीबी, वुड कटर, पोहणाऱ्या व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक यांची मोबाइल नंबरसह यादी तलाठी आणि ग्रामपंचायतीकडे तयार करून त्यांच्या संपर्कात राहावे.

ग्रामपंचायतस्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुद्धीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतुकीकरण पावडर उपलब्ध करून घ्यावी. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षित जागी साठवून ठेवावे. चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी, पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत, याची दक्षता ग्राम कृती दल, ग्रामपंचायतीने घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये. कोणत्याही परिस्थितीत घबराटीची स्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपले क्षेत्र चक्रीवादळाच्या धोक्यात असल्याने तत्काळ खाडी, सागरी किनारा आणि इतर पाणथळ जागांपासून सुरक्षित ठिकाणी जावे. खिडक्या, दरवाजे काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालाव्यात. बाहेरील दरवाजांना मजबूत टेकू देण्यात यावा. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने स्थलांतराचे आदेश दिल्यास तत्काळ आदेशाचे पालन करन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना तात्काळ मदत आणि उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत आणि ग्राम कृती दलांनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून ठेवावी.शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी (02352) 226248 किंवा रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षात (02352) 223127 या क्रमांकावर संपर्क साधावा.