तरूण नेत्याचा दुर्दैवी अंत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तरूण नेत्याचा दुर्दैवी अंत

काँग्रेसचे तरूण नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांचे अवघ्या सेहेचाळीसाव्या वर्षी दुसर्याच एका विषाणुच्या संसर्गाने निधन व्हावे, हा खरोखरच नियतीचा क्रूर खेळ म्हटला पाहिजे. कोविडमधून ते बरे झाले होते. तरीही दुसर्या विषाणुने त्यांचा बळी घेतला. राजीव सातव काँग्रेसचे होते हा भाग वेगळा. पण ते चांगले आणि प्रामाणिक नेते होते, हे महत्वाचे. हल्ली प्रामाणिक नेते कंदिल घेऊन शोधले तरीही सापडत नाहित. राजीव सातव त्याला अपवाद होते. दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि त्यात राजीव एक होते. सातव घराण्याची काँग्रेसनिष्ठा आणि त्यापेक्षाही गांधी घराण्यावरील निष्ठा प्रसिद्धच आहे. त्यांच्या आई रजनी सातव या हिंगोलीच्या आमदार होत्या. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे समजले जात. काँग्रेसमध्ये जी काही तरूण आणि उमद्या, काहीतरी चांगले करून दाखवण्याच्या मिषाने आलेल्या नेत्यांची फळी  होती आणि जे कधीच बनचुके झाले नाहित, त्यांच्यापैकी एक राजीव सातव होते. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, विश्वजीत कदम अशा सारख्या काही चांगल्या युवा नेत्यांच्या क्लबमध्ये राजीव सातव यांचे नाव घ्यावे लागेल. राहुल गांधी यांना आपल्या किचन कॅबिनेटमध्ये जुनी खोंडं जी अगोदरच बदनाम झाली होती, ती अजिबात नको होती. आजही राहुल पक्षाचे अध्यक्ष होत नाहित त्यामागे त्यांना या जुन्या प्रस्थापित नेत्यांची लुडबुड नको आहे, हेच कारण आहे. परंतु सोनिया गांधी यांचे सारेच या जुन्या आणि बदनाम नेत्यांवर अवलंबून आहे. असो. पण राजीव सातव यांनी राहुल यांच्या मनात काही खास स्थान निर्माण केले होते, हे मात्र निश्चित. सातव यांच्यावर म्हणूनच राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातेत काँग्रेसची धुरा सोपवली होती. मोदींचे गुजरात हे बलस्थान असल्याने सातव फारसा प्रभाव पाडू शकले नाहित, हे स्वाभाविकच आहे. तरीही दोन हजार सतराच्या विधानसभा निव़डणुकीत काँग्रेसला त्यांनी चांगले यश मिळवून दिले होते. पण सातव हे विशेष गाजले ते त्यांच्या संसदेतील कामगिरीने. चौदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील फक्त दोन खासदार निवडून गेले. त्यापैकी सातव यांनी मनरेगा असो, दुष्काळ असो किंवा आधारकार्ड असो, अनेक प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनीही सातव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसे तर हा राजशिष्टाचार असतो. पण सातव यांच्याबाबतीत मोदी यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या केवळ राजशिष्टाचारापोटी नाहित. सातव यांनी चार वर्षे संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळवला कारण त्यांची उपस्थिती एक्याऐंशी टक्के होती. आणि नुसती उपस्थिती नव्हती तर त्यांनी आपल्या क्षीण ताकदीनुसार आवाज उठवण्याचे संसदसदस्याचे कर्तव्य उत्तम तर्हेने पार पाडले होते. केवळ मौनीबाबा म्हणून ते कधीच बसले नाहित. संसदेच्या कार्यापेक्षा पक्षकार्याला अधिक महत्व देणारा हा तरूण नेता होता. म्हणूनच दोन हजार एकोणीसची निवडणूक ते राहुल यांनी आग्रह करूनही लढले नाहित. उलट त्यांनी गुजरातेत काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणे पसंत केले. दिल्लीतील राजकारणाची चमकदमक त्यांना विचलित करू शकली नाहित. नाहितर आजही अनेक साठ सत्तरचे  खासदारही दिल्लीला गेले की तेथील राजकारणात रममाण होऊन जातात. आपल्या मतदारसंघाला आणि राज्यालाही विसरतात. म्हणून सातव यांचे जाणे जास्तच चटका लावून जाणारे आहे.  आधारकार्डच्या विषयावर सातव यांनी लोकसभेत जे तळमळीने आणि तडृफदारपणे भाषण केले, त्याचे मोदी यांनीही आभारप्रदर्शक भाषणात उल्लेख केला होता. काँग्रेसमधील काही तरूण नेत्यांच्या भाषणांची प्रशंसा केली होती. सध्या कोरोनाच्या सावटात अनेक नेते आणि सेलिब्रिटी मरण पावत आहेत. त्यामुळे कुणाच्या निधनाचा शोक करावा, अशी स्थिती आहे. शोकभावनाही बोथट व्हाव्यात, अशी परिस्थिती आहे. पूर्वी प्लेगची साथ यायची तसे झाले आहे. त्या साथीत काकाकाकू गेल्याचे दुःख पचवेपर्यंत आईवडिल मृत्युमुखी पडलेले असायचे. सातव यांच्या निधनाने काँग्रेसचे मात्र जबर नुकसान झाले आहे. एकतर आधीच काँग्रेस अत्यंत खडतर परिस्थितीतून जात आहे. भाजपच्या आव्हानापुढे ती  टिकेल की नाहि, हीच शंका आहे. पश्चिम बंगालमध्ये चौरेचाळीसवरून ती शून्यावर आली तर इतर राज्यांमध्ये तर भयानकच पराभव वाट्याला आले आहेत. त्यात सोनिया यांच्या पुत्रप्रेमामुळे अनेक तरूण नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यात ज्योतिरादित्य शिंदे यांचा क्रमांक वरचा आहे. सचिन पायलटही कधीही जाऊ शकतात. सोनिया यांना राहुल यांच्या पुढच्या वाटचालीत कुणाचाच अडथळा नको आहे. याही परिस्थितीत सातव यांनी काँग्रेसची साथ सोडली नव्हती, हेच विशेष होते. आता ते स्वतःच गेले आहेत. राहुल  यांची फळी आता कमजोर झाली आहे. याचा फटका काँग्रेसमधील निष्ठावंत आणि बुजुर्ग नेते उचलणार, हे वास्तव आहे.राहुल यांची पक्षातील ताकद कमी होणार आहे. कारण अगोदर ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये जाऊन राहुल यांना कमजोर केले तर सातव जगातूनच निघून गेले.त्यामुळे राहुल यांचा गट आता चांगलाच क्षीण झाला आहे. तरीही राहुल यांचे स्थान नेहमीच ताकदवान राहिल कारण ते सोनियांचे एकुलते एक चिरंजीव आहेत. परंतु स्वतःचे स्थान बळकट असून चालत नाहि. आपला गटही शक्तिशाली असावा लागतो. राहुल यांना नव्याने साथीदारांचा शोध घ्यावा लागेल. सातव यांच्या निधनामुळे खरे नुकसान राहुल यांचे झाले आहे.