जगातील ९६ देशात आढळला कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, आगामी काळात याचा प्रभाव वाढण्याचा डब्ल्यूएचओचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जगातील ९६ देशात आढळला कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, आगामी काळात याचा प्रभाव वाढण्याचा डब्ल्यूएचओचा इशारा

नवी दिल्ली : ज्या देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आढळला अशा देशांची संख्या आता १०० जवळ पोचते आहे. याचा अर्थ आगामी महिन्यांमध्ये जगभर या डेल्टा व्हेरिएंटचा (Delta variant of SARS-CoV-2) प्रभाव असेल असे मत डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization)व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूचा हा डेल्टा सर्वात आधी भारतात आढळला होता. आता तो जगातील ९६ देशांमध्ये पसरल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट आता भारतातील (Corona spread in India) ११ आणखी राज्यांमध्ये पसरला आहे. 

डेल्टा व्हेरिएंट जास्त संक्रमणक्षम

डेल्टा व्हेरिएंट हा आधीच्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५५ टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अल्फा व्हेरिएंट आधी इंग्लंडमध्ये आढळला होता. मात्र आथा इंग्लंडमधील ९० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिएंटने बाधित आहेत. आपल्या दर आठवड्याच्या कोरोना माहितीपत्रात २९ जून २०२१ला जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की ९६ देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची नोंद झाली आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटला ओळखण्याच्या क्षमता सध्या मर्यादित आहेत. कोरोना महामारी असलेल्या देशांमधील डेल्टा व्हेरिएंटने बाधित आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

डेल्टाचा जागतिक अर्थव्यवस्थेला धोका

नुकत्याच रुळावर येत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला डेल्टा व्हेरिएंटमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर कोरोना निर्बंध आणखी दीर्घ कालावधीसाठी लागू करावे लागतील असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. कोरोनाचे विविध व्हेरिएंट समोर येत असल्याने कोरोना निर्बंध दीर्घ काळासाठी लागू करावे लागणार आहेत. विशेषत: ज्या भागात तुलनेने कमी लसीकरण झालेले आहे अशा भागात स्थानिक प्रशासनाने काळजीपूर्वक निश्चित वेळेसाठी हे निर्बंध लागू केले पाहिजेत, असेही पुढे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरात वाढ

कोरोना विषाणूच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांपैकी डेल्टा प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने सर्वाधिक संक्रमित होणारा आणि घातक ठरवले आहे. डब्ल्यूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार अल्फा व्हेरिएंट १७२ देशांमध्ये आढळला आहे. तर बीटा व्हेरिएंट १२० देशांमध्ये आणि गामा ७२ देशांमध्ये आढळला आहे. डेल्टा व्हेरिएंट सध्या एकूण ९६ देशांमध्ये आढळला असून मागील काही दिवसात तो आणखी ११ देशांमध्ये पसरला आहे. भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्यामागे कोरोना बाधितांच्या जागतिक आकडेवारीत झालेली घट कारणीभूत आहे. भारतात मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट सुरू होण्याची भीती जगभर व्यक्त करण्यात येते आहे. अनेक ठिकाणी कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा होऊ लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेमुळे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे जगभर लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे.