उपेक्षित परंतु गुणी संगीतकार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उपेक्षित परंतु गुणी संगीतकार

संगीतकार विजय पाटील तथा राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण यांचे निधन नुसते चटका लावून जाणारे नाहि तर अतिशय
सुपर ड्युपर हिट गाणी देऊनही बॉलिवुडने त्यांना मनापासून स्विकारले नाहि, याची खंत कायमस्वरूपी वाटायला
लावणारे आहे. लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले. ते मूळचे नागपूरचेच होते. सुरेंद्र हेंद्रे यांच्याबरोबर त्यांनी
रामलक्ष्मण या नावाने संगीतकार म्हणून कारकिर्द सुरू केली असली तरीही एजंट विनोदपर्यंत म्हणजे एकोणीसशे
शहात्तरपर्यंतच ही जोडी होती. नंतर हेंद्रे यांचे निधन झाले आणि नंतरचे पुढचे सारे दिव्य आणि अफाट यश हे एकट्या
लक्ष्मण यांचेच होते. लक्ष्मण यांनी नंतर अनेक सदाबहार गाणी दिली, अनेक चित्रपटांना केवळ गाण्यांच्या जोरावर उत्तुंग
यश मिळवून दिले. मिथुन चक्रवर्तीला सुरूवातीला प्रचंड यश मिळवून देण्यात लक्ष्मण यांचा सिंहाचा वाटा होता. तराना,
सुन सजना या चित्रपटांनी मिथुनला प्रस्थापित केले. नंतर भप्पी लाहिरीने लक्ष्मण यांचेच काम पुढे नेले. परंतु मिथुनने
आपल्याला सुरूवातीच्या काळात बॉलिवुडमध्ये स्थिरस्थावर होण्यास मदत करणार्या या गुणी संगीतकाराला चित्रपट
मिळवून दिले नाहित. त्याला ते सहज शक्य होते. लक्ष्मण यांना खरेखुरे यश मिळवून दिले ते राजश्री प्रॉडक्शन्सच्या
कौटुंबिक चित्रपटातील एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांनी. हम आपके है कौन आणि मैने प्यार किया या चित्रपटांच्या
यशात नव्वद टक्के वाटा लक्ष्मण यांच्या गाण्यांचाच होता. नाहितर तसे ते चित्रपट सामान्यच होते. अर्थात राजश्री
प्रॉडक्शन्सनेही त्यांच्या कामाची कदर केली. त्यांच्यासाठी खास कक्ष कायम प्रॉडक्शन कार्यालयात सज्ज असे. पण या
संगीतकाराचे दुर्दैव असे की, इतके प्रचंड यश मिळवूनही पुढे बॉलिवुडमध्ये त्यांना चित्रपट मिळालेच नाहित. दादा कोंडके
यांच्या पांडू हवालदारपासून ओळीने नऊ चित्रपटांची सुपरहिट गाणी देऊनही इतर मराठी चित्रपट निर्मात्यांनी
त्यांच्याकडे संगीताची जबाबदारी सोपवली नाहि. कदाचित त्यांच्यावर दादा कोंडके यांचे संगीतकार म्हणून शिक्का बसला
असावा. लक्ष्मण हे भावपूर्ण चाली देऊ शकणार नाहित, असा काहीसा समज त्यांच्याबाबतीत पसरला असण्याची शक्यता
आहे. परंतु त्यांनी दादा कोंडके यांच्याच काही चित्रपटांत अत्यंत तरल भावूक अशी गाणीही दिली आहेत. चंदनाच्या
पाटावर, सोन्याच्या ताटामंदी हे गाणे नुसते गुणगुणून पाहिले तर त्याची खात्री पटते. एक चित्रपट हिट झाला तर
चित्रपटांची रांग काही संगीतकारांकडे लागते. उदाहरणार्थ राजेश रोशन. परंतु ते भाग्य लक्ष्मण यांचे नव्हते. दादा कोंडके
यांचे कित्येक सुपरहिट चित्रपट आणि राजश्री प्रॉडक्शन्सचे नेहमीचे संगीतकार असा लौकिक असूनही इतरांकड़े त्यांना
फार काम मिळाले नाहि. याला कारण तेव्हा संगीतकारांमध्ये असलेली स्पर्धा हे तर होतेच. परंतु प्रस्थापित संगीतकार
म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर डी बर्मन आणि कल्याणजी आनंदजी याच तीन संगीतकारांमध्ये संपूर्ण बॉलिवुडचे
संगीत विभागले गेले होते. त्यांच्यातून एखादा चित्रपट वाचला तर तो भप्पी लाहिरी किंवा रवींद्र जैन किंवा लक्ष्मण
यांच्याकडे येई. वास्तविक रवींद्र जैन यांनीही उत्तमोत्तम चित्रपट आणि गाणी दिली.परंतु त्यांनाही फारसे चित्रपट
मिळाले नाहित. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची सारी गाणी हिट कधीच झाली नाहित. तरीही सतत आपल्या गाण्यांचे
हॅमरिंग करण्याचे म्हणून जे तंत्र असते, ते इतरांना जमले नाहि. अर्थात असे म्हणताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या
संगीतकार म्हणून असलेल्या महान दर्जाबाबत कुठेही अधिक्षेप करण्याचा हेतू नाहि. बॉबीसारख्या चित्रपटात त्यांनीही
सारी गाणी हिट करून दाखवली आहेत. परंतु पहिला चित्रपट पारसमणीनंतर त्यांच्याकडे कधीच कामाचा तुटवडा
नव्हता, तसे चित्र इतरांकडे कधीच दिसले नाहि. अगदी शेवटी आघाडीचा संगीतकार पंचमदा यांच्याकडेही चित्रपट
नव्हते. लक्ष्मण यांनी हम आपके है कौन, मैने प्यार किया आणि हम साथ साथ है या चित्रपटांमधील सारी गाणी हिट
होण्याचा चमत्कार करून दाखवल्यानंतरही त्यांना पुढे चित्रपट मिळाले नाहित. लता मंगेशकर यांनाही नव्वदच्या
दशकात इतर संगीतकारांनी गाणी दिली नाहित. नदीम श्रवण आणि अनु मलिक असे ताज्या दमाचे संगीतकार आले
होते.त्यांच्या तुलनेत लक्ष्मण मागे पडले. तर अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्पर्धेत लतादीदींनाही गाणी
मिळाली नाहित. तरीही त्यांनी दीदी तेरा दिवर दिवाना असे गाणे दिले होते ज्याची लोकप्रियता आजही आहे. लक्ष्मण
यांच्या गुणांची कदर बॉलिवुडने केली नाहि, हेच खरे. अन्यथा कितीतरी सुमार संगीतकारांनी वर्षानुवर्षे येथे चित्रपट

मिळवले आहेत. एखाद्या हिट गाण्याच्या जोरावर अनेक चित्रपट पदरी पाडून घेतले आहेत. तसे काही लक्ष्मण यांच्या
बाबतीत झाले नाहि. लक्ष्मण यांचे संगीत हे ऑर्केस्ट्रावर आधारित होते. तसे संगीत नंतरच्या काळात चालेनासे झाले
होते. हेही एक कारण असावे. लक्ष्मण यांना अखेरच्या काळात अर्धांगवायुचा झटका आला होता. ते नागपूरलाच रहात
होते. त्यामुळे त्यांचा बॉलिवुडशी कसलाच संबंध उरला नव्हता. एका गुणी परंतु उपेक्षित संगीतकाराची अखेर झाली.