भारताची दुहेरी ‘रौप्य’कमाई

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताची दुहेरी ‘रौप्य’कमाई

भारताच्या महिला आणि मिश्र दुहेरी संघांनी जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत दोन रौप्यपदकांची कमाई केली. दोन्ही संघांना अंतिम फेरीत कोलंबियाने पराभूत केले.

कंपाऊंड प्रकारातील मिश्र दुहेरीत अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी कोलंबियाच्या डॅनियल मुनोज आणि सारा लोपेझ या कोलंबियन जोडीकडून १५०-१५४ असा चार गुणांच्या फरकाने पराभव पत्करला. महिला सांघिक गटात सारा, अलेहान्द्रो ऊसक्वीनो आणि नोरा वाल्देझ यांचा समावेश असलेल्या कोलंबियाने सातव्या मानांकित भारतावर २२९-२२४ अशी मात केली. भारताच्या महिला संघात ज्योती, मुस्कान किरर आणि प्रिया गुर्जर यांचा समावेश होता.

महिलांमध्ये क्रमवारी फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोलंबियाने भारताविरुद्ध तब्बल १५ वेळा १० गुणांवर अचूक वेध साधला. पहिल्या फेरीनंतर दोन्ही संघांत ५८-५८ अशी बरोबरी होती. यानंतर भारताने आघाडी मिळवण्याची संधी गमावली. कोलंबियाने ही लढत पाच गुणांच्या फरकाने जिंकली. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत कोलंबियन जोडीने चांगल्या सुरुवातीनंतर तिसऱ्या फेरीत ४० पैकी ४० गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. कोलंबियाने एकूण १६ प्रयत्नांत १० बाण अचूक १० गुणांवर मारले.