भारत-अमेरिका संबंधांची अपरिहार्यता

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारत-अमेरिका संबंधांची अपरिहार्यता

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मधुर होत चालले आहेत, हे पंतप्रधान मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या अमेरिका दौर्यावरून स्पष्ट झाले आहे. भारत आणि अमेरिका यांचा संयुक्त लष्करी सराव, दोन देशांसह जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची मिळून बनलेली क्वाड आघाडी, मोदी आणि बिडेन यांच्यात झालेली मनमोकळी आणि सौहार्द्रपूर्ण चर्चा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला अमेरिकेने दिलेला पाठिंबा यावरून भारत-अमेरिका एकमेकांच्या जवळ येत चालले आहेत, हे सांगण्यासाठी जास्त अकलेची गरज नाहि. एकेकाळी अमेरिका पाकिस्तानला झुकते माप देत असे आणि भारताला सावत्रपणाची वागणूक देत असे. सत्तरच्या दशकात जेव्हा पाकिस्तान पूर्व भागावर म्हणजेच आताच्या बांगलादेशवर अत्याचार करत होता आणि त्यामुळे निर्वासितांचे लोंढे भारतावर आदळत होते. तेव्हा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे सरळ दोन तुकडेच केले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी अमेरिका इतकी संतप्त झाली होती की तत्कालिन परराष्ट्रमंत्रि किसिंजर यांनी सातवे आरमार भारताजवळच्या समुद्रात आणून ठेवले होते. वेळप्रसंगी अमेरिकेची भारतावर हल्ला करण्याची तयारी होती. नंतर भारताच्या मदतीला धावून आला तो नेहमीचा भारताचा मित्र रशिया. अमेरिकेला शहाणपणा सुचला आणि पुढचा अनर्थ टळला. पण तेव्हापासून भारत अमेरिका संबंध कमालीचे कडवट बनले होते. आता ती परिस्थिती पूर्णपणे उलटीपालटी झाली आहे. भारताच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीमुळे जगाने आश्चर्याने तोंडात बोट घातले आहे. भारत आता फक्त हत्ती आणि सापांचा देश राहिला नाहि, हे जगाला उमजले आहे. भारत अमेरिका संबंध मजबूत होण्यासाठी भारताची विशाल बाजारपेठ हेही एक कारण आहे. आणि अमेरिकेला आता पाकिस्तानची तितकीशी गरजही उरलेली नाहि. त्यामुळे भारताकडेच अमेरिकेचा आता ओढा आहे. पण मोदी यांची अमेरिका भेट आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत त्यांनी मांडलेले विचार वेगळ्या पार्श्वभूमीवर होते. अफगाणिस्तानात सत्तांतर होऊन क्रूरकर्मा अशी तालिबानची राजवट सत्तेवर आली आहे. तालिबानला पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे. पाकिस्तान आणि तालिबान हे जगासमोर निर्माण झालेले सर्वात मोठे संकट आहे. त्याचाच उल्लेख मोदींनी केला आणि अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जाऊ नये, असे पाकिस्तानला ठणकावले. तालिबानचा सर्वाधिक धोका हा भारतालाच आहे कारण तालिबान पाकिस्तानी दहशतवाद्यांना सारी मदत देऊन कश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाठवणार, याची सदोदित भीती भारताला सतावत रहाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत मोदींनी जागतिक व्यासपीठावर हा मुद्दा प्रभावी रितीने मांडल्यावर जगाचा हार्दिक पाठिंबा मोदींनाच लाभला. भारताला असलेला धोका किती गंभीर आहे, ते जगाच्या लक्षात आले. क्वाडमुळे चिन अस्वस्थ आहे कारण चिनच्या विरोधात ही आघाडी जाऊ शकते, हे त्याला माहित आहे. संपूर्ण आशियात आपले वर्चस्व स्थापन करण्याचाचिनचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठीच क्वाडची निर्मिती झाली आहे. तालिबानला चिनने पाठिंबा देऊन आपण भारतविरोधी आहोत, हे पुन्हा सिद्ध केले आहे. चिनच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे पाकिस्तान आणि तालिबानचे मनोधैर्य वाढले आहे. हे भारतासाठीच सर्वाधिक धोकादायक आहे. अफगाणिस्तानचा प्रदेश आता जगासाठी धोका ठरला आहे, हे जगाला पटवून देण्यात मोदी यशस्वी ठरले, हेच त्यांच्या अमेरिका दौर्याचे यश आहे. क्वाड शिखर बैठकीवर चिनची प्रतिक्रिया त्याला या आघाडीची किती भीती वाटते आहे, याची निदर्शक आहे. तिसर्या जगाच्या सदस्य देशाला चार देशांच्या समूहाने लक्ष्य करू नये, असे चिनचे म्हणणे आहे. पण ज्या देशाला लक्ष्य करायचे आहे, तो देशच जर दहशतवादाचा पाठिराखा आणि दहशतवादात प्रत्यक्ष गुंतलेला असेल तर काय करायचे, यावर चिनकडे उत्तर नाहि. अशा देशाविरोधात जगाने प्रयत्न का करू नयेत, याबाबत चिनने मौन पाळले आहे. उलट क्वाडचे सदस्य देश हीच आपली जागतिक जबाबदारी पार पाडत आहेत. उलट चिननेही पाकिस्तान आणि तालिबानविरोधात या आघाडीत सामिल व्हायला हवे. पण विस्तारवादाने आंधळा झालेला चिन नेमका उलट विचार करतो. चिन जरी स्वतःला विश्वशांतिचा निर्माता समजत असला तरीही यासारखा दुसरा विनोद नाहि. त्याच्या असल्या भाषणबाजीवर केवळ पाकिस्तान आणि तालिबान हेच विश्वास ठेवू शकतील. पण आता भारत आणि अमेरिका यांनी द्विपक्षीय संबंधांच्या बाबतीतही खूप प्रगति केली आहे आणि यामुळेच खरा चिनचा जळफळाट झाला आहे. त्याचे खरे दुःख हेच आहे. ज्यो बिडेन यांच्या सरकारनेही मोदींच्या विस्तारवादाच्या विरोधातील विचारांना सहमति दर्शवली आहे. हा चिनसाठी जोरदार झटका आहे. मोदी आणि बिडेन यांची भेट अगदी ट्रम्प यांच्याइतकी मित्रत्वाच्या भावनेने झाली नसली तरीही अत्यंत सौहार्द्रपूर्ण वातावरणात झाली. ही पहिलीच भेट होती. यानंतर ज्या भेटी होतील त्यातून भारत अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होतील. अमेरिकेला सध्या भारताची गरज आहे कारण चिनच्या विस्तारवादाला अमेरिकेलाही आवर घालायचा आहे. त्यासाठी भारतासारखा उपयोगी पडणारा मित्र दुसरा नाहि. त्यामुळे भारत अमेरिका संबंधांचे मधुर पर्व आता पुढच्या टप्प्यात पोहचले आहे, एवढे मात्र निश्चित आहे. भारत आणि अमेरिका यांना आता एकमेकांशी मधुर संबंध आणखी दृढ करणे अपरिहार्य बनले आहे, हेच नवी जागतिक परिस्थिती दर्शवते.