भारतीय लष्करासमोर नवे आव्हान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय लष्करासमोर नवे आव्हान

गेल्या रविवारी सकाळी सारा भारत शांतपणे कोविडच्या दुसर्या लाटेच्या धक्क्यातून सावरत असतानाच, जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या जम्मूतील तळापासून अगदी जवळ ड्रोनने स्फोटके उतरवून त्यांचा स्फोट घडवण्य़ात आला. केवळ काही अंतराने दहशतवाद्यांचे लक्ष्य चुकले अन्यथा जेथे स्फोट झाला, त्यापासून अगदी थोड्या अंतरावर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सची रांग होती. इंग्लंडच्या ग्लॅमर्गनमध्ये शिकलेल्या आणि मूळचा बांगलादेशी असलेल्या सुजान नावाच्या इंजिनियरने ड्रोनद्वारे स्फोटके नेऊन स्फोट घडवण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले. अर्थात त्याने हे तंत्रज्ञान घातपाती कारवाया करण्यासाठीच शोधले त्यामुळे त्याचे कौतुक करण्याचे काहीच कारण नाहि. हे तंत्रज्ञान प्रथम त्याने तुर्कस्तानमध्ये वापरले. त्याचीच नक्कल रविवारच्या भारतीय हवाई तळापासून जवळ करण्यात आली. सुदैवाने भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले नाहि परंतु भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील कमजोरी त्यामुळे जगासमोर खरे म्हणजे दहशतवादी गटांसमोर उघड झाली आहे. खरे आव्हान हेच तर आहे. भारतीय लष्करासमोर आता हे ड्रोनद्वारे होणार्या हल्ल्यांचे नवीनच अवघड आव्हान उभे राहिले आहे. वास्तविक अगदी लहानशा ड्रोन्सचा वापर लष्कर-ए-तैय्यबाचे दहशतवादी आपली शस्त्रे आणि स्फोटके इकडून तिकडे नेण्यासाठी करत आले आहेत. परंतु आयईडी असलेले ड्रोन्स लक्ष्यावर आदळण्याचे तंत्रज्ञान ते वापरणार, ही काळ्या दगडावरची रेघ होतीच. परंतु ती केव्हा, हाच प्रश्न होता. तो दिवस रविवार ठरला इतकेच.त्यामुळे भारतीय लष्कराला या हल्ल्याचे आश्चर्य वाटलेले नाहि परंतु या प्रकाराचा मुकाबला करण्यासाठी अत्यंत लवकर पावले उचलली पाहिजेत, हे मात्र त्यांच्या लक्षात आले आहे. रविवारचे लक्ष्य चुकले ते ड्रोन्सला दिशा देणार्या जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम चुकीची असल्याने. अन्यथा मोठाच अनर्थ घडला असता. परंतु भारतीय लष्कर त्यामुळे सावध झाले, हे एक चांगलेच झाले. मात्र अशा प्रकारचा हल्ला होणार, पण तो केव्हा इतकाच तज्ञांच्या दृष्टिने प्रश्न होता. अशा ड्रोन्सद्वारे हल्ले करण्याचा हल्लेखोरांना अनेक फायदे असतात. एक तर असे हल्ले करणारे लहान ड्रोन्स ओळखून काढणे खूप अवघड जाते. त्यांना मध्येच ओळखून त्यांना निष्प्रभ करणे खर्चिकही असते. आणि याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, दहशतवादी गटांना अशा हल्ल्यांसाठी पाकिस्तानी नागरिकांचा वापर करावा लागत नाहि. जसा तो पठाणकोट किंवा उरी हल्ल्यांसाठी करावा लागला होता. ड्रोन्सचा मार्ग आणि ते कुठून सोडण्यात आले, हे शोधणे त्यातील जीपीएसमुळे सहज शक्य आहे. परंतु नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूनेही ते सोडण्यात आले असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानला अशा हल्ल्यात हात असल्याचा सरळ इन्कार करता येऊ शकतो, हा त्यातील मोठाच तोटा भारताच्या दृष्टिने आहे. भारताला आता असलेल्या धोक्यांचा स्तर या मानवरहित ड्रोन हल्ल्यांनी वाढला आहे. ड्रोन्स हल्ले येथून पुढे नियमित स्वरूपात होऊ शकतात. त्यामुळे भारतीय संरक्षण व्यवस्थेला यासाठी तयार रहावे लागेल. सुरक्षेचा एक नवीनच आयाम विकसित करावा लागेल. अशा मानवरहित साधनांतून स्फोटके पाठवून त्यांचे स्फोट घडवण्याची ही कल्पना नवीन मुळीच नाहि. ऑस्ट्रेलियन लष्करी अधिकारी फ्रांझ युकॅटियसने अठराशे एकोणपन्नासमध्येच ही कल्पना राबवली होती. व्हिएन्नाला वेढा देऊन  बसलेल्या सैन्यावर त्याने या प्रकारच्या तंत्रज्ञानाने बाँब हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. मोठे बलून्स तयार करून त्यात पंधरा किलोग्रॅम स्फोटके भरून त्याने असे हल्ले केले होते. मात्र वार्याने त्याचा प्रयत्न उधळून लावला होता. या ड्रोन्स हल्लेखोरांसाठी जमेची बाजू ही आहे की, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हे अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. असे ड्रोन्स बारा मैलापर्यंत पाठवले जाऊ शकतात, आणि जम्मूतील भारतीय हवाई तळ हा अवघ्या भारत पाकिस्तान सीमेपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर आहे. यावरून धोका आपल्या किती जवळ आहे, हे लक्षात येते. गेल्या वर्षी इराणने सौदी अरेबियाच्या तेल कंपन्यांवर असे ड्रोन्सने हल्ले करून त्या उध्वस्त केल्या. सौदीचे प्रचंड नुकसान झाले. आणि त्यावेळी जगातील आधुनिक लष्करी व्यवस्थाही या स्वस्तातील पण प्रलयंकारी तंत्रज्ञानाच्या बाबतीत किती असहाय्य आहेत, तेही जगाच्या लक्षात आले होते. तीच परिस्थिती आज भारताची आहे आणि भारताला याबाबतीत आता अगदी तातडीने काहीतरी करावे लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांची बैठक घेऊन या धोक्यावर चर्चा केली, हे योग्यच झाले. मात्र आता या लहान परंतु जबरदस्त धोक्याच्या बाबतीत भारत सावध असून असे धोके परवतुन लावण्यासाठी तो तयार आहे, असा संदेश आता जगापर्यंत जाणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा या हल्ल्यापासून स्फूर्ति घेऊन अन्य दहशतवादी गट हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच या दहशतवादी गटांवर याच प्रकारचे तंत्रज्ञान वापरून नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे. भारतासह अनेक देशांच्या लष्करी व्यवस्थांमध्ये ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यरत आहेत. जॅमर बसवून ड्रोन चालवणारे आणि प्रत्यक्ष ड्रोनची हालचाल यातील संपर्क तोडता येतो. तसेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिममध्ये फेरफार करून ड्रोनला मार्गदर्शन करणार्यांना भटकवता येते. यामुळे ते जेथे ड्रोन आहे असे समजतात, त्यापेक्षा भलत्याच ठिकाणी ड्रोन  असते. भारतीय हवाई तळावर हल्ला का करण्यात आला, याचे  साधे कारण सांगता येईल. भारतावरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याच्या घरावर हल्ला करण्यात आला, तो भारताच्या रॉ ने केला असल्याचा संशय आयएसआयला आहे. परंतु त्यामुळे भारताला  आता ड्रोन हल्यांविरोधात तंत्रज्ञान बळकट करण्याची संधी मिळाली आहे आणि ती गमावता कामा नये.