लाल मातीचा बादशाह राफेल नदालनं घेतला ‘मोठा’ निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लाल मातीचा बादशाह राफेल नदालनं घेतला ‘मोठा’ निर्णय

लाल मातीचा बादशाह राफेल नदालने मोठा निर्णय घेतला आहे. स्पेनचा महान टेनिसपटू नदालने पायाच्या दुखापतीमुळे २०२१चा हंगाम संपण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की नदाल यूएस ओपनमध्ये खेळणार नाही. २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नदाललला गेल्या आठवड्यात सिनसिनाटी मास्टर्स आणि कॅनेडियन ओपनमधून बाहेर पडावे लागले.

गतविजेता डॉमिनिक थीम आणि पाचवेळा विजेता रॉजर फेडररनेही यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. ३५ वर्षीय नदालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणाला, ”खरं सांगू, एका वर्षापासून मी माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल खूप चिंतित आहे आणि मला थोडा वेळ हवा आहे.”

तो पुढे म्हणाला, ”टीम आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. माझा विश्वास आहे की दुखापतीतून सावरण्याचा हा मार्ग आहे. आत्तासाठी, मी स्वत: वर अजून मेहनग घेणार आहे. माझा असा विश्वास आहे, की पायाची दुखापत बरी होऊ शकते. दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी मी शक्य तितकी मेहनत घेईन.” चार वेळा यूएस ओपन चॅम्पियन नदालने विम्बल्डन आणि ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. जूनमध्ये फ्रेंच ओपन दरम्यान त्याला दुखापत झाली होती. फ्रेंच ओपनमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने राफेल नदालला पराभवाची चव चारली होती. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात नदालची चांगलीच दमछाक झाली. नदालला ३-६, ६-३, ७-६, ६-२ ने पराभूत करत जोकोविचने अंतिम फेरी गाठली होती.