तुष्टीकरणाचे राजकारण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तुष्टीकरणाचे राजकारण

सध्या राजकारणात तुष्टीकरणाचे दिवस आहेत. काँग्रेसच्या काळात ते नेहमीच होते. अल्पसंख्यांकांना सतत चुचकारून  आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सार्या परिसीमा पार केल्या होत्या. या देशातील प्रत्येक साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे, असे वक्तव्य करण्यापर्यंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मजल गेली होती. त्यांना त्याची शिक्षा मिळाली आणि सत्तेतून त्यांच्यासकट काँग्रेस दूर झाला. तेव्हापासून तो दूरच आहे. आताही पंजाबमध्ये काँग्रेसने चार उपाध्यक्ष निवडले त्यात प्रत्येक जातीचा नेता असेल, याची दक्षता घेतली. उमेदवारी देतानाही काँग्रेससह सर्वच पक्षांनी जातीय मते किती याचा विचार केला आणि त्यानुसारच तिकिटे दिली. हा इतिहास आहे. पण भाजपनेही काँग्रेसचाच जातीय तुष्टीकरणाचा कित्ता गिरवण्यास सुरूवात केली आहे. ताजे उदाहरण म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी प्रथम आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांची झालेल्या निवडीचे देता येईल. भूपेंद्र पटेल हे कडवा या पाटिदार जमातीच्या पोटजातीतील आहेत. मध्यंतरी पाटिदार समाजाने आरक्षणासाठी जोरदार आंदोलन केले होते. त्यातूनच हार्दिक पटेलचे नेतृत्व समोर आले होते. त्याच कडवा जातीचे पटेल हे असून त्यामुळे आता पाटिदार समाजाला काहीसा दिलासा मिळाला असेल. भाजप सरकारने आरक्षण दिले नाहि, यासाठी या समाजाचा भाजपवर याच कारणासाठी राग होता. आता तो काहीसा थंड होऊ शकतो. पाटिदार समाजाच्या नाराजीमुळे आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले होते. त्यानंतर विजय रूपानी यांना निवडण्यात आले. आता रूपानी यांनाही जावे लागले आहे आणि त्यांच्याजागी आलेले भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन यांचे निकटवर्तीय समजले जातात. हा एक काव्यगत न्यायच आहे. मुख्यमंत्रि बदलण्यास भाजप अगोदर नाखुष असायचा. आनंदीबेन यांचा अपवाद वगळता याअगोदर पक्षाने हरयाणा, झारखंड आणि राजस्थान या राज्यांचे मुख्यमंत्रि बदलले नव्हते. त्यांना बदलण्याची जोरदार मागणी पक्षातूनच होत होती. याचा फटका भाजपला जोरदार बसला. राजस्थान थोड्या फरकाने का होईना, पण भाजपला गमवावे लागले. कारण वसुंधरा राजे शिंदे यांच्याबद्दल सार्वत्रिक नाराजी होती. तर झारखंड आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांबद्दल राज्यव्यापी असंतोष होता. झारखंडमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली तर हरयाणात चौताला यांच्यासमवेत युती करून कशीबशी भाजपने सत्ता टिकवली आहे. मात्र हल्ली भाजपने हा पॅटर्न बदललेला दिसतो. आता भाजपने निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष मुख्यमंत्रि बदलण्याचे तंत्र आरंभले आहे. कर्नाटकात अद्याप निवडणुकीला अवकाश असला तरीही बी एस येडीयुरप्पा यांना बदलण्यात आले. त्यांच्याजागी एस आर बोम्मई यांच्या पुत्राची निवड करण्यात आली. उत्तराखंडमध्ये तर दोनदा मुख्यमंत्रि बदलण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. तिरथसिंग रावत यांची सौम्य प्रतिमा आणि मृदु स्वभाव त्यांच्या पदाच्या आड आला. त्यांना बदलून दुसर्या रावत यांना नेमण्यात आले. पण त्यांच्या नियुक्तिमुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. मग पुष्कर धामी यांची नियुक्ति करण्यात आली. पण गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष उत्तुंग यश मिळवू शकत नाहि, याची खात्री पटल्यानेच भाजप श्रेष्ठींनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला. रूपानी हे अमित शहा यांचे निकटवर्ती समजले जातात. त्यामुळेच जेव्हा राजनाथ सिंग यांनी जेव्हा गुजरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली, तेव्हा अमित शहा यांची अनुपस्थिती ठळक होती. त्यानंतर रूपानी यांना राजिनामा देण्याचा आदेश देण्यात आला. आता भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिमा जपण्याची फार मोठी जबाबदारी आहे. कारण मोदी हेच या राज्याचे सर्वेसर्वा आहेत. कोणतीही निवडणूक भाजप लढतो तेव्हा मोदींच्या चेहर्यावरच लढत असतो. असे असले तरीही नवा मुख्यमंत्रि अत्यंत लोकप्रिय असला पाहिजे, हे भाजपसाठी आवश्यक आहे. भूपेंद्र पटेल तसे आहेत, कारण ते अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत आणि इतरही अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. शिवाय संपूर्ण पाटिदार समाज त्यांच्या मागे उभा रहाण्याची शक्यता आहे. पाटिदार समाजाला आर्थिक दुर्बल वर्गातून दहा टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे हा वर्ग आता भाजपच्या मागे जाण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय नव्याने गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवडून आलेले सी आर पाटील यांनीही भाजपला बहुतेक पोटनिवडणुकांत यश मिळवून दिले आहे. पाटिदार समाजाचा मुख्यमंत्रि, मोदी यांची लोकप्रियता, पाटील यांचे संघटन कार्य या जोरावर भाजपला पुन्हा गुजरातेत यश मिळण्याची शक्यता आहेच. अर्थात असेच यश रूपानी यांच्या काळात मिळण्याची शक्यता कमी होती, असे भाजप ज्येष्ठ नेत्यांना वाटते. आम आदमी पार्टीने उभे केलेले जोरदार आव्हान आणि कोविड प्रश्न नीट न हाताळल्याचा रूपानी यांच्यावर होत असलेला आरोप यामुळे रूपानी यांना जावे लागले. पण आता पटेल यांना पुन्हा भाजपला लोकप्रियता मिळवून द्यावी लागणार आहे आणि कोविडचा प्रश्न हाताळण्यातील ढिलाईचा आरोप पुसून टाकावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना आपली लोकप्रियता आणि अनुभव पणाला लावावा लागणार आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल्यानुसार, लोकांना नेहमीच बदल हवा असतो. आम्ही उत्कृष्ट कपडे घातले तरीही आम्हाला नवीन कपडेही हवेच असतात. त्यांच्या या उद्गारातच गुजरातेतील बदलांचे रहस्य दडले आहे.