प्रमुख भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी झाला ‘फिट’, करोना चाचणी आली निगेटिव्ह

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रमुख भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी झाला ‘फिट’, करोना चाचणी आली निगेटिव्ह

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल. साहा आता इंग्लंड दौरा आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौर्‍यासाठी साहाची २० सदस्यीय संघात निवड झाली. मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.

४ मे रोजी हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी साहा करोना पॉझिटिव्ह आढळला होता. आयपीएल २०२१चा हंगाम त्याच दिवशी पुढे ढकलण्यात आला. साहा एका वृत्तसंस्थेला म्हणाला, “मेच्या पहिल्या दिवशी सरावानंतर मला थकवा जाणवत होता. मला थंडी वाटत होती. त्याच दिवशी मी डॉक्टरांना सांगितले. त्याच दिवशी करोना चाचणी घेण्यात आली. दुसर्‍या दिवशी ही चाचणी निगेटिव्ह आली. दुसर्‍या दिवशी पुन्हा चाचणी केली आणि ही चाचणीही निगेटिव्ह आली. पण तरीही मला तापामुळे सर्वांसह सामील करण्यात आले नाही. तिसर्‍या दिवशी चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली होती.”