लाटेला कसे रोखणार?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लाटेला कसे रोखणार?

भारतात आता कोरोनाची तिसरी लाट येणार, हे जवळपास सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे. एकच दिलासा देण्यात आला आहे आणि तो म्हणजे ही लाट पहिल्या दोन लाटांइतकी भयानक नसेल. पहिल्या दोन लाटांइतका अनर्थ ही तिसरी लाट घडवण्याची शक्यता नाहि. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या तज्ञ डॉक्टरांनी हा निर्वाळा दिला असल्याने त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाहि. येत्या ऑगस्टमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र ती पहिल्या दोन लाटांइतकी भयानक का नसेल, याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. जरी डेल्टा विषाणु रोगप्रतिकारशक्तिला डावलून पुढे जाऊ शकत नसला तरीही लोकसंख्येत तो अतिशय वेगाने पसरतो, असेही तज्ञ म्हणाले आहेत. यावरून असे दिसते की, तिसरी लाट येणार असली तरीही ती इतकी भयानक नाहि. मात्र रूग्णसंख्या खूप वाढू शकते. तसेही लोकांना आता घरात बसून रहाण्याची सवय झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनला व्यापारी वर्ग सोडला तर फारसा कुणाचा विरोध राहिलेला नाहि. अर्थात याचा अर्थ लोकांनी घरात बसून काढावा किंवा त्यांना सरकारने घरातच कोंडून घालावे, असा मुळीच नाहि. मात्र सरकारांना-मग ते केंद्रातील असो किंवा राज्यातील-सरकारांना लॉकडाऊन आवडू लागला आहे. एकतर त्यामुळे विरोधकांची उपद्रवशक्ति बरीच कमी होते. महाराष्ट्रासारख्या राज्यात जेथे सरकारची अवस्था अगदीच नाजूक आहे, तेथे तर लॉकडाऊन सरकारसाठी उपकारक बनूनच आला आहे. मात्र त्यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे आणि कंपन्या बंद पडल्याने रोजगार घटले आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाहि. त्याचा परिणाम आज दिसणार नसला तरीही उद्या जरूर दिसणार आहे. कोणत्याही सरकारला आज मजा वाटत असली तरी उद्या त्याचे भयानक परिणाम सरकारच नव्हे तर जनतेलाही भोगावे लागणार आहेत. रोजगाराची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट सौम्य आहे की नाहि, याची चर्चा करण्यापेक्षा तिला रोखणार कसे, यावर विचार करणे जास्त आवश्यक आहे. गेल्या दोन आठवड्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली असता असे दिसेल की, देशाच्या अनेक भागांत कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच आहे. पॉझिटिव्हिटी रेट अजूनही ईशान्येच्या ३७ जिल्ह्यांसह देशाच्या अनेक भागांत १० पेक्षा वर आहे. तर महाराष्ट्रात नवीन कोरोनाचे स्पॉट्स समोर येत आहेत. केरळमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख चढताच राहिला आहे. त्यामुळे लोकांना वाईट वाटले तरीही तज्ञाचा सल्ला असा आहे की, लॉकडाऊन आणखी सुरू राहिला पाहिजे. पण देशात कोरोना आटोक्यात आणण्यातील एक महत्वाचा अडथळा आहे. तो म्हणजे भारतीय लोकांचा अतिउत्साही स्वभाव. त्याला बेफिकिरी असेही म्हणता येईल. गजबजलेले बाजार आणि पर्यटन केंद्रे यामुळे कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडेल, अशी भीती तज्ञांना वाटते. त्यात तथ्यही आहे. याचे कारण असे की, लोक गर्दीतही मास्क वापरत नाहित आणि एकमेकांच्या संपर्कात येतात. पण लोकांना दोष देण्यार्या राजकीय नेत्यानी स्वतःकडेही पाहिले पाहिजे. राजकीय सभा, आंदोलने, गर्दीच्या सभा हे राजकीय नेते तरी कुठे थांबवत आहेत. त्यांनी मोर्चे आयोजित करून किती लोकांमध्ये कोरोना पसरवला आहे, हे कुणालाच सांगता येणार नाहि. लोक जसे बेफिकिर  आहेत, तसेच ते राजकारणीही आहेत. फक्त राजकारणी मंडळी लोकांना उपदेश करताना थकत नाहित. कोरोनाला अटकाव करण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधक उपाययोजना राबवणे हे राज्यांवर सोपवले आहे. परंतु राज्यांनी जेव्हा कोरोना केसेसची संख्या प्रचंड वाढली तेव्हा दुर्दैवाने याचा अर्थ केवळ लॉकडाऊन लावला आणि राज्याचे नुकसान झाले. राज्यांनी जर संभाव्य रोग पसरवणार्या कार्यक्रमांना चाप लावला असता तर त्यांच्यावर आणिबाणीचे उपाय योजण्याची वेळ आली नसती. केवळ लॉकडाऊन लावून कोरोना आटोक्यात येणार नाहि. उत्तराखंडने प्रसिद्ध कावड यात्रेवर बंदी घातली आणि शहाणपणा दाखवला. ते धार्मिक  ध्रुविकरणावर जोर देणार्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रि योगी आदित्यनाथ यानीं दाखवले नाहि आणि त्यांनी कुंभमेळ्याला परवानगी देऊन टाकली.त्यात उत्तरप्रदेश तसेच देशभरात कोरोना पसरला. तेच काम पहिल्या वेळेस तबलिगी परिषदेने केले होते. राज्यांनी आणि जनतेने सामंजस्य दाखवले तर कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येऊ शकते. त्यासाठी लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु त्याबाबतीत खुद्द केंद्र सरकारने अनेक चुका केल्या आहेत. लसींचा पुरवठ्याची शाश्वती केंद्राने घेतली नाहि. परिणामी अनेक राज्ये लसीविना आहेत. लस नसल्याने लोकांना कोरोनाचा धोका आहे आणि तशाच अवस्थेत ते फिरत आहेत. त्यामुळे किती जणांमध्ये आपण कोरोना पसरवत आहोत, याबद्दल ते अजाण आहेत. या परिस्थितीवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे लोकांनी स्वतःहून कोविड नियमावलीचे पालन करणे.लोक जोपर्यंत कोरोना नियमावलीचे पालन करत नाहित, तोपर्यंत कोरोनाची तिसरीच काय पण चौथी लाटही आटोक्यात येणार नाहि.