मुंबईत २७ जूनपर्यंत लेव्हल तीनचे निर्बंध कायम, सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा बंदच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत २७ जूनपर्यंत लेव्हल तीनचे निर्बंध कायम, सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा बंदच

मुंबई,: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी आजपासून २७ जूनपर्यंत लेव्हल तीनचे निर्बंध कायम राहतील. त्यामुळे तूर्तास सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले.  

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि अन्य परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकात म्हटले आहे की, मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट .७९ टक्के आणि व्याप्त ऑक्सिजन बेड क्षमता २३.५६ टक्के आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई खरंतर लेव्हल एक मध्ये आहे. मात्र, मुंबईची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या घनतेचे प्रमाण, मुंबईत एमएमआर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या यासह टास्क फोर्स आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेली तिसऱ्या लाटेची शक्यता, या तीन बाबीही लक्षात घेणे आवश्यक आहे.  असे असले तरी शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य उपाययोजना अनिवार्य आहेत. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे निर्देशही आयुक्त चहल यांनी दिले आहेत