तिसरी लाट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिसरी लाट

तज्ञ डॉक्टरांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अगदी उंबरठ्यावर असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात तर ही लाट सुरू ही झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. तिसरी लाट अधिकच भयंकर असणार आहे, हे भाकित कधीच वर्तवून झाले आहे. त्यामुळे आता लोकांनी आणि सरकारी आरोग्य यंत्रणांनीही जास्तच दक्ष रहाण्याची गरज आहे, हे तर उघडच आहे. कोरोनामुळे इतके बळी जाऊनही काही जणांच्या मते कोरोना हे थोतांड आहे. हे जर थोतांड असेल तर मग इतके लक्षावधी बळी कसे गेले, असे त्यांना विचारायला हवे. अर्थात कोरोनाच्या निमित्ताने केंद्र आणि  राज्य सरकारांनी हवी तशी मनमानी केली, लोकांचे खासकरून लहान व्यावसायिकांचे आणि नोकरदार वर्गाचे जिणे हराम केले, हे खरेच आहे. मात्र यासाठी कोरोनाला थोतांड ठरवणे हे चुकीचे आहे. पण ते असो. आता तिसरी लाट आली आहे किंवा येणार आहे, असे तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही आपण त्यासाठी तयार आहोत का, हा मुख्य प्रश्न आहे. भारतीयांचा अतिउत्साही स्वभाव सार्या अनर्थाला कारण ठरत आहे. जरा कुठे कोरोनाचे प्रमाण कमी झाले की लगेच भारतीय लोक प्रवासाला आणि पर्यटनाला निघतात. सध्या देशातील पर्यटकांची आकडेवारी भयानक आहे. नैनीताल या उत्तराखंडमधील प्रख्यात पर्यटन स्थळावर कालच्या रविवारी तब्बल २० हजार पर्यटक जमले होते, अशी अधिकृत आकडेवारी आहे. हे तर फक्त एक उदाहरण झाले. महाराष्ट्रातही लोणावळा, कोकणातील पर्यटनस्थळे तसेच समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. यामुळे किती प्रमाणात कोरोना विषाणु पसरला असेल, याची कल्पनाही करता येणार नाहि. पर्यटक आपल्या लहान मुलांना पर्यटनस्थळावर घेऊन जातात. तिसर्या लाटेचा खरा धोका लहान मुलाना असल्याचे सांगितले जाते. आपल्या मुलांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, याची जाणीव या पालकांना असली पाहिजे. आणि यांचा ढोंगीपणा असा की शाळांमध्ये ते मुलांना कोरोनाचा धोका आहे, म्हणून पाठवत नाहित. पहिल्या आणि दुसर्या लाटेत सरकारी आरोग्य यंत्रणांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेच. पण तिसर्या लाटेतही आरोग्य यंत्रणांनी परिस्थिती नीट हाताळली नाहि तर मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. कारण तिसर्या लाटेचा व्हेरियंट खूपच ताकदवान आणि लसींना न जुमानणारा आहे, असे मानले जाते. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारे तसेच नागरिकांसमोरही किती मोठे आव्हान आहे, हे लक्षात येईल. तिसर्या  लाटेचा मुकाबला करताना सर्वात मोठे आव्हान हे आहे की, लसींना न जुमानणारे विषाणु किंवा व्हेरियंट ओळखून काढणे. याच व्हेरियंटमुळे लसीकरणाचा काहीही फायदा होत नाहि. आणि लस घेतलेले लोक निर्धास्तपणे बाहेर फिरत असतात. परंतु त्यांना हे माहित नाहि की, आपण स्वतः तर धोक्यात आहोतच, पण प्रियजनांना किती धोक्यात आणत आहोत. म्हणूनच भारताच्या सर्वोच्च डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन केले आहे की, कोरोनाच्या विरोधात ज्या काही उपाययोजना सुरू आहेत, त्यात कोणतीही कमी येऊ नये. तसेच लोकांना दक्षतेच्या सूचना जोरकसपणे केल्या पाहिजेत. लोकांनी आता स्वतःच हे समजून घेतले पाहिजे की, सरकार तिसर्या लाटेपुढे हतबल आहे, जसे ते पहिल्या आणि दुसर्या लाटेपुढे होते. लसीकरणाचा आधारही या लाटेत नसणार. कारण हा व्हेरियंट कोणत्याही लसीला जुमानतच नाहि. त्यामुळे लसीकरणाची गोष्ट त्याच्यापुढे व्यर्थ आहे. तिसरी लाट येणार की नाहि, यात आता शंकाच राहिली नाहि. कारण अनेक देशांनी चौथी लाट अनुभवली आहे. तिसर्या लाटेसाठी कारण ठरणारा विषाणुचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. अत्यंत घातक असा हा विषाणु आहे आणि त्यासाठी तो ओळखणे खूपच अवघड आहे. शिवाय तो अँटीबॉडीज तसेच लसीला दाद न देणारा  असल्याने मृत्युची संख्या भयानक वेगाने वाढू शकते. शिवाय तो सतत आपल्यात बदल घडवत असल्याने त्याच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाहि. लसीकरण वेगाने करणे हाच एक उपाय सध्या तरी आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे. परंतु भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत संथ आहे. लसीकरणाचा बोजवारा उडाल आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त संख्येने तिसर्या लाटेत बळी पडू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणेने आता सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. विशेषतः  ग्रामीण भागात लसीकरण होणे खूप गरजेचे आहे. कारण आरोग्य यंत्रणेपुढे ग्रामीण आरोग्य हीच सर्वात मोठी समस्या आहे. याहीपेक्षा मोठी समस्या आहे ती लोकांची आत्मसंतुष्टता. लोक कोरोना आता जणू हद्दपार झाला, असे समजून कोविड नियमावलीचे पालन करत नाहित. बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि भाजीबाजार यात प्रचंड गर्दी  आहे. आणि मास्कही वापरले जात नाहित. हे वर्तन एकट्यादुकट्याच्या नव्हे तर सार्या भारतींयांच्या मुळावर येणारे आहे. आता जर दक्षता घेतली नाहि तर चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी कुणी जिवंतच रहाणार नाहि.