एकाच ध्रुवावर दोघे आपण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एकाच ध्रुवावर दोघे आपण

काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा डाव्यांचा नेहमीचा आरोप असतो.तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डावे कधीही काँग्रेसशी युती करू शकतात आणि वर पुन्हा शहाजोगपणे काँग्रेसवर वेगवेगळे आरोपही लावतात. ते असो. पण सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपुढे एकच आव्हान आहे, असे म्हणावे लागते. दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि भाजप हे पंजाब आणि उत्तरप्रदेशात एकाच प्रकारच्या आव्हानांना सामोरे गेले होते. उत्तरप्रदेशात भाजपच्या सरकारवर मुख्यतः योगी आदित्यनाथ यांच्यावर कोविड प्रश्न नीट हाताळला नाहि, याबाबत जोरदार आरोप झाले होते. उत्तरप्रदेशात गंगेच्या काठावर हजारो कोविडग्रस्तांची प्रेते तशीच टाकून दिली आणि त्यानंतर ती बिहारमध्ये वहात आली, असा आरोप होत होता आणि त्यासाठी योगींना आरोपीच्या पिंजर्यात काँग्रेसने उभे केले होते. तेव्हा योगींवर आरोपांची धार इतकी होती की खुद्द केंद्रिय नेतृत्वही योगींवर नाराज झाले होते. त्यामुळे योगींना दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेऊन खुलासा करावा लागला होता. मात्र अजूनही पुढल्या वर्षीच्या सुरूवातीला होणारी विधानसभेची निवडणूक योगींच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार की नाहि, याबाबत काहीही खुलासा भाजपकडून करण्यात आलेला नाहि. उत्तरप्रदेश हे भाजपसाठीच नव्हे तर सर्वच पक्षांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे कारण लोकसभा जागांच्या दृष्टिने हे सर्वात मोठे राज्य आहे. कारण या एकट्या राज्यात लोकसभेच्या ८४ जागा आहेत तर विधानसभेच्या ३२५. अगोदरच मोदी सरकारविरोधात आवाज अधिकच मोठ्याने उठू लागला असताना या राज्यात विजय मिळवणे भाजपसाठी किती महत्वाचे असेल, हे सांगायला नकोच. भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने योगींचे नेतृत्व तर कायम ठेवले पण विविध जातींच्या मंत्र्यांना संधी देऊन सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग केला. त्यात योगींचे फारसे काही चालले नाहि. उत्तरप्रदेश भाजपमध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांचा योगींना विरोध आहे पण पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. अशांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला लावले आहे. हा भाजपचा उत्तरप्रदेशात निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिने केलेला प्रयोग आहे. जे आव्हान भाजपला उत्तरप्रदेशात आहे, तेच आव्हान काँग्रेसला पंजाबात आहे. पंजाबमध्ये आता प्रांताध्यक्ष झालेले नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग यांच्यात आडवा विस्तव जात नाहि. सिद्धू यांच्या महत्वाकांक्षा आणि अमरिंदर यांची राज्यातील पक्षावर असलेली पकड यामुळे हा संघर्ष पेटला आहे. सिद्धू दिल्लीला गेले आणि पक्षश्रेष्ठींना भेटले. त्यांनी राहुल यांची भेट घेतली नाहि परंतु प्रियंका गांधी यांची भेट घेतली. अखेर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. निवडणुकीत अमरिंदर यांनी जिवाचे रान करून काँग्रेसला जिंकून आणले तरीही मुख्यमंत्रिपदावर सिद्धू दावा करू शकतात. त्यामुळे अमरिंदर चांगलेच नाराज आहेत. काँग्रेससाठी हा गुंता खूपच मोठा आहे. दोन टोकाचे मतभेद असलेले नेते एकत्र कशी निवडणूक लढवणार आणि त्यात पक्षाला यश तरी कसे येणार, हा प्रश्न आहे. पण याला पक्षश्रेष्ठींचाही नाईलाज आहे. पंजाब काँग्रेसमध्ये दुसरे चांगले आणि करिष्मा असलेले नेतेही नाहित. सिद्धूंना प्रांताध्यक्ष करून काँग्रेसने स्मार्ट खेळी केली आहे. अमरिंदर यांच्या गोटाची मते तर मिळतीलच पण प्रस्थापितविरोधी मतेही काँग्रेसला मिळू शकतात. कारण सिद्धू यांनी एकाच वेळेस पक्षातील विरोधक म्हणून काम केले आहे. सिद्धू यांनी अमरिंदर यांच्यावर आरोप करून विरोधकांचाही अवकाश खाल्ला आहे. भाजपचे सूत्र अगदी सोपे आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे रहा, असाच संदेश सर्वांना दिला गेला आहे.  पण काँग्रेसचे सूत्र अधिक अवघड आहे. कारण अमरिंदर यांना पक्षातीलच प्रबळ अशा नेत्याविरोधात लढायचे आहे. दोन्ही पक्ष सध्या येणार्या निवडणुकीवर लक्ष ठेवून चाली आखत आहेत. म्हणून दोघांपुढेही एकच आव्हान आहे. आता भाजपने आपले लक्ष कर्नाटकसारख्या राज्याकडे वळवले आहे. येडीयुरप्पा यांना कदाचित जावे लागणार आहे, असे दिसते आहे. कदाचित आज त्यांच्या उत्तराधिकार्याची घोषणा केली गेलेली असेल. पण येडीयुरप्पा यांना काढणे इतके सोपे नाहि. कारण लिगांयत जात ही त्याचा आधार आहे आणि या जातीची कर्नाटकात भरपूर लोकसंख्या आहे. त्यामुळे लिंगायत जातीचा मताधार गमावणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाहि. येडीयुरप्पा यांना बदलल्यास भाजपला कसे आपले स्थान पक्के करता येईल, हेही पहावे लागेल. दक्षिणेत भाजप आता बर्यापैकी रूळला आहे. पूर्वी ज्या भाजपला दक्षिणेत स्थानही नव्हते, आज दोन राज्ये भाजपच्या ताब्यात आहेत. ही गोष्ट भाजपची उत्साह वाढवणारी आहे.

भाजपसाठी दक्षिणेत स्थान मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. तर काँग्रेसने आपले लक्ष राजस्थानकडे वळवले आहे. सचिन पायलट जवळपास काँग्रेस सोडण्याच्या अवस्थेतून परत आले आहेत. त्यांनी तर उंबराही ओलांडला होता. पण ते पुन्हा परत आले. पण काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आश्वासनांची अमलबजावणी होण्याची ते वाट पहात आहेत. अन्यथा ते कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या केंद्रिय मंत्रिपदाकडे ते आशेने पहात आहेत. ते जर शिंदे यांच्याबरोबरच गेले असते तर त्यानाही आता केंद्रिय मंत्रिपद मिळाले असते. दोन्ही पक्षांकडे आपापल्या राज्यांची युनिट व्यवस्थित करण्याकडे लक्ष द्यावे लागत आहे. कारण पुढील वर्षी होणार्या निवडणुका या महत्वाच्या आहेत. म्हणून दोन्ही पक्ष सध्या एकाच ध्रुवावर आहेत.