“दुसऱ्या कसोटीसाठी विराटने चुकीची टीम निवडली”; माजी क्रिकेटपटूचा आक्षेप

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“दुसऱ्या कसोटीसाठी विराटने चुकीची टीम निवडली”; माजी क्रिकेटपटूचा आक्षेप

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने निवडलेल्या अंतिम ११ जणांच्या संघावर इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने आक्षेप घेतला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाने चुकीचा संघ निवडल्याचं त्याने सांगितलं आहे. अंतिम ११ खेळाडूत आर. अश्विनचं नाव नसल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या ट्वीटनंतर मायकल वॉन भारतीय क्रिकेट फॅन्सच्या रडारवर आला आहे.

“असं वाटतंय इंग्लंडने योग्य खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिलं आहे. मात्र भारताने योग्य संघ निवडला नाही. आर. अश्विन संघात हवा होता. कारण तो गोलंदाजीसह फलंदाजीही करु शकतो. तसेच प्रत्येक परिस्थितीत गोलंदाजी करु शकतो. गोलंदाजांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.” असं ट्वीट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने केलं आहे. विराटने शार्दुल ठाकुर ऐवजी संघात इशांत शर्माला स्थान दिलं आहे.

आर. अश्विन आतापर्यंत ७९ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने २,६८५ धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने एकूण १०,१४४ धावा देत ४१३ गडी बाद केले आहेत. त्यात दोन डावात ३० वेळा पाच गडी बाद केले आहेत. तर ७ वेळा १० गडी बाद केले आहेत. दुसरीकडे लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंडदरम्यान एकूण १८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १२ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर भारताने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर ४ सामने अनिर्णित ठरले आहेत. या मैदानात इंग्लंडचं विजयी टक्केवारी ही ६६ टक्के आहे. तर भारताची विजयी टक्केवारी ११ टक्के आहे. भारताला १९८६ आणि २०१४ सालात विजय मिळाले होते.