श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविड प्रशिक्षकपदी?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविड प्रशिक्षकपदी?

माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख राहुल द्रविड याच्याकडे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यापासून प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. विलगीकरणाच्या नियमांमुळे भारतीय खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सहाय्यक प्रशिक्षकही या संपूर्ण काळात इंग्लंडमध्येच वास्तव्यास असतील.

त्यामुळे जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासोबत ४८ वर्षीय द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवले जाऊ शकते. त्याशिवाय एनसीएमधील अन्य सहाय्यक प्रशिक्षकही द्रविडच्या मदतीला असण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताची संघनिवड अपेक्षित आहे. या दौऱ्यात भारत-श्रीलंका संघात १३, १६ आणि १९ जुलै रोजी अनुक्रमे तीन एकदिवसीय सामने, तर २२, २४ आणि २७ जुलै रोजी तीन ट्वेन्टी-२० लढती खेळवण्यात येतील. सर्व सामने कोलंबो येथे होतील.

‘‘श्रीलंका दौऱ्यासाठी राष्ट्रीय निवड समिती अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देणार आहे. या दौऱ्यासाठी द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासह पाठवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. द्रविडला गेल्या अनेक वर्षांपासून एनसीएयेथे प्रशिक्षण देण्याबरोबरच भारत आणि १९ वर्षांखालील संघांनाही मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे. बीसीसीआयआणि द्रविड यांच्यात याविषयी चर्चा सुरू असून द्रविडच्या मदतीला एनसीएमधील सहाय्यक प्रशिक्षकांची फळीही असेल,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.