शीख समुदायाच्या विरोधानंतर तालिबान्यांची माघार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शीख समुदायाच्या विरोधानंतर तालिबान्यांची माघार

 काबुल, : अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस तालिबान्यांचे वर्चस्व वाढत आहे. अशातच या तालिबान्यांनी पवित्र गुरुद्वारा थाल साहिबवरही नुकताच कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र येथील धार्मिक झेंडा हटवताच जगभरातील शीख समुदायाकडून जोरदार विरोध झाला. त्यानंतर तालिबानकडून माघार घेण्यात आली आणि सदर झेंडा पूर्ववत त्याच ठिकाणी लावण्यात आला.

काय आहे पार्श्र्वभूमी
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य टप्प्याटप्प्यात बाहेर काढले. त्यानंतर तालिबानी अतिरेकी देशातील महत्वाच्या ठिकाणांवर कब्जा करत त्या त्या ठिकाणी पांढरा झेंडा फडकवत आहेत. यापुढे जात तालिबान्यांनी पकतिया प्रांतातील पवित्र गुरुद्वारा थाल साहिबवर कब्जा करत तेथील शिखांचा धार्मिक झेंडा काढून टाकला होता. हा गुरुद्वारा शीख समुदायासाठी महत्वाचा आहे. त्यांचे गुरु नानक देव देखील येथे आले होते. तालिबानने हे निशान हटवताच जगभरातून शीख समुदायाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

निशान साहिब हटवल्याचे फोटो व्हायरल
त्यानंतर तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने दावा केला की, निशान साहिब हटवण्यात आलेला नाही. परंतू त्याचा दावा काही मिनिटांतच फोल ठरला. कारण निशान काढताना आणि काढल्यानंतरचे फोटो व्हायरल झाले होते. यामुळे तालिबानचे कुकृत्य जगासमोर उघड झाले होते आणि तालिबान दुसऱ्या धर्माचा अनादर करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चोहोबाजूंनी टिकेचा भडीमार झाल्यानंतर तालिबानने निशान साहिब पुन्हा होता त्या जागेवर फडकवला आहे.

१९८० पासून या भागात तालिबान्यांचे वर्चस्व
अफगानिस्तानच्या युद्धग्रस्त भागात दशकांपासून अल्पसंख्यांक शीख आणि हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. पकतिया भागात १९८० पासून मुजाहिद्दीन आणि तालिबान हक्कानी गटांचे वर्चस्व होते. त्यांचा दहशतवाद एवढा होता की, अफगान सरकार देखील यात कधी पडत नव्हते. गेल्या वर्षी निदान सिंह सचदेव यांचे अपहरण करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या आधी सेवेसाठी ते आले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले.