भारत-इंग्लंड कसोटी मालिका : ओव्हलवर विजयक्रांती!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : ओव्हलवर विजयक्रांती!

लंडन : अखेर ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारताच्या विजयाची क्रांती घडली. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह (२/२२) अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला.

यापूर्वी, १९७१मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. यंदा विराट कोहलीच्या शिलेदारांनी हा पराक्रम करताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दिलेले ३६८ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताच्या दुसऱ्या डावातील शतकवीर रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल.

रविवारच्या बिनबाद ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्‍स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्‍सचा (५०) अडथळा दूर केला. डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला.

१४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली. जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो (०) आणि ऑली पोप (२) यांना त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. मात्र शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला.

ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हर्टन (१०) यांनी थोडा वेळ भारताचा विजय लांबवला. मात्र उमेश यादवने या दोघांना माघारी पाठवले. अखेर ९३व्या षटकात उमेशनेच जेम्स अँडरसनला बाद केले आणि कोहलीसह सर्व खेळाडू आणि स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.