अमेरिकची नाचक्की

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमेरिकची नाचक्की

अफगाणिस्तानात रक्तहीन किंवा अधिक अचूकपणे सांगायचे तर एकही गोळी न झाडता तालिबानी राजवट पुन्हा वीस वर्षांनंतर आली. तीन लाखांच्या अफगाण सैन्याने तालिबानसमोर संपूर्ण शरणागती कसलाही प्रतिकार न करता पत्करली. तर अशरफ गनीसारख्या पळपुट्या माणसाच्या हाती या शूर म्हणवल्या जाणार्या देशाची सत्ता होती, हे धक्कादायक आहे. गनी चार कार भरून पैसे आणि एका हेलिकॉप्टरसह पळाला. पण त्याला वाटते तसे त्याचे पुढचे जीवन सोपे नाहि. सध्या तो ताजिकीस्तानमध्ये असल्याचे सांगण्यात येते, पण तालिबान त्याच्यामागे लागले तर कोणताही देश त्याला आश्रय देऊन विकतचे दुखणे घेईल, असे वाटत नाहि. पण अफगाण नागरिकांचा विश्वासघात केला तो गनी आणि अमेरिकेने. आपले सैन्य माघारी गेल्यावर तालिबानची राजवट येणार, हे अमेरिकेला माहित होते. परंतु अमेरिकेने लोकांना त्याची कल्पना दिली नाहि. अन्यथा आज चढत्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या लोकांना मृत्युला कवटाळण्याची गरज पडली नसती. तालिबानच्या विजयाने अमेरिकेची पुरती नाचक्की झाली आहे. शेहचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेची अशीच नाचक्की व्हिएटनाममध्ये झाली होती. आज पुन्हा तोच पराभव अमेरिकेच्या वाट्याला आला आहे. सायगाव १९७५ मध्ये पडले आणि अमेरिकन सैन्याला त्या देशातून तोंड झाकून पळून जावे लागले होते. २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदाने हल्ला केला तेव्हा ओसामा बिन लादेनला आश्रय देणार्या तालिबानला धडा शिकवण्याच्या इराद्याने अमेरिका अफगाणिस्तानात घुसली. तेव्हा अमेरिकेच्या या मोहिमेला वैध कारण तरी होते. दोन्ही दहशतवादी आणि त्यांना आसरा देणार्या देशाला शिक्षा करण्यापुरतेच अमेरिकेने आपले उद्दिष्ट ठेवले असते तर हा एक सरळ मामला झाला असता. पण अमेरिकेने त्या देशाची उभारणी आणि तेथील महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे ध्येय ठरवले. हे नसते घोंगडे गळ्यात घेण्याचे अमेरिकेला काही कारण नव्हते. त्यातही महिलांना त्यांचे हक्क देण्याचे एकवेळ समजता येईल. पण अफगाणिस्तानची पुनर्ऊभारणी करण्याचे त्रांगडे अमेरिकेला चांगलेच महागात पडले. एक लक्षात घ्यायला हवे की अफगाणिस्तान हा युगानुयुगे बाह्य जगाकडे तोंड फिरवून बसलेल्या आणि आधुनिक जगाचा तिरस्कार करणार्या पशुपालकांचा देश आहे. तेथे केवळ टोळ्या आहेत आणि त्यात टोळी प्रमुखांचा आदेशच मानला जातो. त्यात महिलांना समान हक्क वगैरे शब्द कुणी ऐकलेही नाहित. अशा समाजाला एकदम आधुनिक शतकातील संस्कृती शिकवू पहाणार्या अमेरिकेची चूक अक्षम्य होती. कारण नंतर जेजे काही अफगाणिस्तानात घडले, ते अमेरिकेच्या या नसत्या शहाणपणामुळे घडले. अमेरिकेची दुसरी चूक होती ती म्हणजे त्यांनी पाकिस्तानची निवड तालिबानविरोधी लढ्यात केली. वास्तविक पाकिस्तान कधीही तालिबानच्या विरोधात जाऊ शकत नाहि. कारण मग पाकिस्तान शिल्लक रहाणार नाहि. अमेरिकन सैन्याच्या तालिबानविरोधी लढ्यात पाकिस्तानी लष्कराने सहभागी व्हावे, ही अमेरिकेची अपेक्षा. पण पाकिस्तानने धूर्तपणे डाव खेळला आणि भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणला. यानंतर पाकिस्तानच्या पूर्व सीमेवर भारताने मोठी लष्करी जमवाजमव केली आणि पाकिस्तानला अमेरिकेला मदत न करण्यासाठी जोरदार कारण मिळाले. भारत आणि अमेरिका हे दोघेही पाकिस्तानच्या या धूर्त डावाला बळी पडले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता तर पाकिस्तानच्या ते जास्तच सोयीचे झाले असते. पण तसे काही घडले नाहि आणि नंतर तरी पाकिस्तानला अमेरिकेच्या या मोहिमेत आपण तिच्याबरोबर आहोत, असा देखावा करावा लागला. मुळात पाकिस्तानी सैनिक अमेरिकेन सैनिकांवर हल्ले करत होते आणि अमेरिका तालिबानला धडा शिकवण्यात गुंतली होती. पाकिस्तान हा रोग होता आणि तालिबान हे लक्षण होते. पण अमेरिकेने मूळ रोगापेक्षा लक्षणावरच इलाज करणे सुरू ठेवले होते. त्याच्या परिणामी आज अमेरिकेला अपमानास्पद रित्या अफगाणिस्तानातून बाहेर पडावे लागत आहे. लादेन पाकिस्तानात अबोटाबादमध्ये सापडल्यानंतरही अमेरिकेला आपण पाकिस्तानच्या हातात कठपुतळीसारखे नाचत आहोत, याचा अंदाज आला नाहि. सर्व जगाला शहाणपण शिकवणार्या अमेरिकेच्या या चुकांमुळे अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या हाती गेला आहे. तालिबानची सत्ता आणण्याच्या कामात पाकिस्तान हा खरा खलनायक आहे. पण साळसूदपणे त्याच्याकडे डोळेझाक करून सारे जग सध्या तालिबानला लक्ष्य करत आहे. तालिबान क्रूरकर्मा आहेच, पण त्यांना पुन्हा सत्तेवर आणण्यात अमेरिकेच्या चुका आणि पाकिस्तानचे डावपेच न ओळखण्याचा मूर्खपणा जास्त कारण आहे. आणि शेवटची चूक म्हणजे हमिद करझाई आणि अशरफ गनी यांच्यावर आंधळेपणे ठेवलेला विश्वास. करझाई आणि गनी हे दोघेही संपूर्णपणे दुर्बळ, अमेरिकेच्या जिवावर अय्याशी करणारे नेते होते. त्यांच्याकडे विश्वासार्हता काडीचीही नाहि. जसे अमेरिका शीतयुद्धाच्या काळात सौदीच्या राजाला खास विमानाने अमेरिकेला नेऊन जबरदस्त पाहुणचार करून आपल्या तेल कंपन्यांसाठी कंत्राटे मिळवून घेत, तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानात करू पाहिले. पण गनी असो की करझाई, अमेरिकेला तेवढाही त्यांचा उपयोग झाला नाहि. देशालाही त्यांचा उपयोग झाला नाहि. घुसखोरीने भरलेल्या देशात सरकार कसे चालवावे, याचे काडीचेही ज्ञान किंवा कौशल्य या दोघांपाशीही नव्हते. ते अमेरिकेच्या हातचे बाहुले बनू शकत होते, इतक्या त्यांच्या अवगुणांवर त्यांची निवड करण्यात आली होती. अखेर व्हायचे तेच झाले. तालिबानच्या हाती एकही गोळी न झाडली जाता सत्ता आली आणि हे दोघे देश सोडून परागंदा झाले. अमेरिकेला चुका महागात पडल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची नाचक्की झाली आणि मानवी हक्कांबाबतही अमेरिकेची दुटप्पी भूमिका जगासमोर आली. यापुढे अमेरिका कोणत्याही देशाला मानवी अधिकारांबाबत उपदेशाचे डोस देऊ शकणार नाहि. अमेरिकेच्या या चुकांमुळे सर्वात जास्त नुकसान मात्र अफगाणिस्तानसारख्या एका सुंदर देशाचे झाले. राजा झहिरच्या काळातील आधुनिक आणि सुंदर असा देश आता उजाड वाळवंटासारखा होण्याला कारण अमेरिकेच्या चुकाच आहेत.