करोनास्थिती पाहता आता ‘या’ शेजारी राष्ट्रानं भारतीय प्रवाशांवर घातली बंदी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनास्थिती पाहता आता ‘या’ शेजारी राष्ट्रानं भारतीय प्रवाशांवर घातली बंदी

भारतात करोनामुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. भारतात वाढत असलेल्या करोना संकटाचा इतर देशांनी धसका घेतला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आहे. आता त्यात शेजारी असलेल्या श्रीलंकेची भर पडली आहे. श्रीलंकेनं भारतीय प्रवाशांना आपल्या देशात येण्यावर निर्बंध घातले आहेत. करोनाचे रुग्ण आपल्या देशात वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील प्रवशांना श्रीलंकेत उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही असं श्रीलंकन नागरी उड्डयन प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे.

करोनामुळे श्रीलंकेच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे श्रीलंका आता पर्यटकांसाठी श्रीलंकेची दारं खुली करण्याच्या विचारात आहे. मात्र भारतातील स्थिती पाहून श्रीलंकन सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. श्रीलंकेतही करोनानं आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात १९३९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १४ जण करोनामुळे दगावले आहे. श्रीलंकेत करोनामुळे आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना करोनाची लागण झाली आहे. दुसऱ्यांदा देशात करोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे.यापूर्वी ३० एप्रिलला देशात करोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी करोनावर मात केली आहे. देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी करोना रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाचे प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.