संकटांच्या फेर्यात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संकटांच्या फेर्यात

देशावर एकामागून एक संकटे येत आहेत. संकटे एकदा आली की अनेक येतात, असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर सध्या भारत घेत आहे. कोविडच्या फेर्यात अडकलेल्या भारतात लसीकरण होत नव्हते तेव्हा लस नाहि म्हणून राजकारण रंगले होते. सरकारही बावचळून गेले होते. त्यानंतर लस आली आणि तिच्या पुरेशा उपलब्धतेवरून राजकारण सुरू झाले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील कलगीतुरा यानिमित्ताने समोर आला. आता लस आली आणि कालच्या एकवीस जूनपासून तिचे व्यवस्थित वाटप सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू एच ओ) एक भयानक बातमी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, कोविडवरील कोणत्याही लसीमध्ये डेल्टा हा जो नवा कोविड विषाणुचा व्हेरियंट आला आहे, त्याला प्रतिकार करण्याची क्षमता नाहि. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, कोविडवरील लसीमध्ये डेल्टापासून वाचवण्याची शक्ति नाहि. याचा अर्थ जे लोक लस घेऊन स्वतःला सुरक्षित समजून इकडेतिकडे धावत आहेत, त्यांना आता पुन्हा भीती आहे. ज्यांनी लस घेतली नाहि, त्यांचे आयुष्य तर धोक्यात आहेच, परंतु ज्यांनी लस घेतली आहे ते ही आता धोक्यात आहेत. यापेक्षाही डब्ल्यू एच ओने दिलेली दुसरी माहिती खूपच महत्वाची आणि चिंता वाढवणारी आहे. डेल्टा व्हेरियंटची प्रसार होण्याची क्षमता पूर्वीच्या विषाणुपेक्षा खूपच जास्त आहे. डेल्टा व्हेरियंटची प्रसारक्षमता जबरदस्त असल्याने तो जागतिक स्तरावर आता लवकरच सर्वत्र पसरेल आणि अख्खी मानवजात संकटात येईल, असे डब्ल्यू एच ओच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. याचा अर्थ, हा धोका दुहेरी आहे. एक तर नव्या व्हेरियंटची प्रसारक्षमता जास्त आहेच, परंतु त्याची मृत्य घडवून आणण्याची ताकदही जास्त आहे. वाचकांना घाबरवून टाकण्यासाठी हे लिहिलेले नाहि. तर लोकांनी सतत मास्क घालून रहाणे, सतत हात धुणे आणि शारिरिक अंतर राखण्याची काळजी घेणे हे यापुढे किती जास्त महत्वाचे ठरणार आहे, हे समजावे, यासाठी ही माहिती दिली आहे. आणि ही माहिती थेट डब्ल्यू एच ओच्या वैज्ञानिकांनी दिली असल्यामुळे तिच्याबद्दल कुणी शंका घेण्याचे धाडस करेल, असे वाटत नाहि. लॉकडाऊन आता अनेक ठिकाणी शिथिल झाला आहे. त्यामुळे लोक पुन्हा पूर्वीसारखीच गर्दी करू लागले आहेत आणि मास्कच्या शिस्तीचे पालन होताना दिसत नाहि. ही आपल्या लोकांची मानसिकता आहे आणि त्यात कुणी बदल करू शकत नाहि. परंतु एरवी साधे रस्ता ओलांडण्याचे कायदे मोडण्याचा आनंद घेणे वेगळे आणि कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्यात हयगय करण्यातील आनंद घेणे वेगळे आहे, हे लोकांनी समजायला हवे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केले नाहि तर स्वतःच्या जिवावरच बेतू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. स्वामीनाथन यांच्या मते आता संपूर्ण स्थिती इतकी भयानक झाली आहे की हा सतत उत्परिवर्तन घडवणारा विषाणु सर्वत्र पसरत आहे आणि त्याचा संसर्ग करण्याचा वेगही कितीतरी जास्त आहे. शिवाय तो लसींनाही जुमानत नाहि, हा त्याचा तिसरा अवगुण आहे. डेल्टा असो की याच्या अगोदरचे उत्परिवर्तित झालेले विषाणु, औषधांमुळे शरिरात जे प्रतिपिंड(अँटीबॉडीज) तयार होतात, त्यांनाही चुकवून पुढे घुसण्याची क्षमता या विषाणुंमध्ये आहे. त्यात आता डेल्टा व्हेरियंट हा लसीमुळेही विचलित होत नाहि. हे खूप धोकादायक आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे सध्याच देशात इतकी दहशत पसरली आहे की लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना लस हाच एकमेव आधार होता. आता तोही राहिला नसल्याने सारेच सैरभैर झाल्याचे दिसते आहे. आणि पंतप्रधान मोदी आपल्यातच मश्गुल आहेत. मोदी यांनी समोर येऊन लोकांना विश्वास आणि धीर देण्याची हीच वेळ आहे. मोदी यांनी कोरोना काळात लोकांसाठी खूप काही केले आहे. मात्र आता त्यांना उदासिनता दाखवून चालणार नाहि. डेल्टा व्हेरियंट सध्या जगातील ऐंशी देशांमध्ये आढळला आहे. डेल्टाचे संकट दारावर नाहि तर घरात घुसले आहेत. महाराष्ट्रात तब्बल एकवीस लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचे अधिकृत वृत्त आहे. यावरून किती सावध रहाण्याची वेळ आपल्यावर आली आहे, हे लक्षात येते. राज्यातील राजकीय नेते मात्र आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी करून, वगैरे राजकारणात मग्न आहेत. राजकीय पक्षांकडून लोकांनी आशा करणे केव्हाच सोडून दिले आहे. लोकांनी स्वतःचे संरक्षण स्वतःलाच करायचे आहे, हे स्विकारले आहे. त्यामुळे लोकच आता दक्षता घेतात. राजकीय पक्षांची साठमारी ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. आणखी एक भयानक बातमी आली आहे ती महाबळेश्वरातून. तेथे गेल्या वर्षी सापडलेल्या वटवाघळात निपाह विषाणु आढळला आहे. हा तर भयानक विषाणु आहे आणि त्यामुळे होणार्या मृत्युचे प्रमाण पासष्ट ते शंभर टक्के आहे. कोरोनामुळे होणार्या मृत्युचे प्रमाण एक ते दोन टक्के आहे. भारतासारख्या विशाल देशात निपाह पसरला तर केवढा मोठा अनर्थ होईल, याचा विचार करा. आणि निपाहवर अजूनही औषध किंवा लस सापडलेली नाहि. महाराष्ट्रावर संकटांचे फेरे वाढत चालले आहे आणि त्याचे भान राज्यकर्त्यांना नाहि. राज्यकर्त्यांच्या अनास्थेचा विषाणु सर्व विषाणुंपेक्षाही भयंकर आहे.