रेमडेसिव्हिरचा वापर केवळ गरजेपुरता करावा- जिल्हाधिकारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रेमडेसिव्हिरचा वापर केवळ गरजेपुरता करावा- जिल्हाधिकारी

नाशिक, 04 मे (हिं.स) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवित असतांनाच रेमडेसिव्हिर हे पात्र व गरजु रुग्णांनाच देण्यात येत असल्याची खातर जमा करावी व याच्या वापराबाबतचे सर्व लेखे रुग्णालयामध्ये जतन केले जात असल्याची खात्री करावी अशा सुचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निफाड व सिन्नर या दोन्ही तालुक्यांना भेट देवून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत रेमडेसिव्हिरचा अनावश्यक वापर होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. तसेच आतापर्यंत दैनंदिन प्राप्त रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत प्रत्येक रुग्णालयाकडून विहीत केलेल्या नमून्यात माहिती मागविण्यात यावी. त्याच बरोबर सर्व डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटर मध्ये ऑक्सिजन वापराबाबतचे ऑडीट करून त्याचा वापर प्रमाणित मापदंडाइतका असल्याचे नियमीतपणे तपासण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिले आहेत. ज्या रुग्णालयाने तपासणी दरम्यान रेमडेसिव्हिरचा वापर त्या रुग्णालयातील रुग्णांसाठी न करता बाहेरच्या रुग्णांना दिल्याबाबत आढळले असेल अशा रुग्णालयास नोटीस देवून त्याबाबतचा खुलासा मागवावा. तसेच खुलासा न दिल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी मांढरे दिल्या आहेत. याबैठकीनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पानगव्हाणे रुग्णालय व निफाड मल्टिस्पेशालिटी रुग्णालय या खाजगी कोविड रुग्णालयांसह शासकीय डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (डी.सी.एच.सी) भेट देऊन रेमडेसिव्हिर बाबत तपासणी केली. निफाड येथील बैठकीनंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी सिन्नर तालुक्यात जावून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच सिन्नर तालुक्यातील दोन ऑक्सिजन प्रकल्पांना भेट दिली.

त्यातील एका ऑक्सिजन प्रकल्पातून 13 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मीती करण्यात येत असून त्यामाध्यमातून मालेगाव व ग्रामीण भागास ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेला स्वस्तिक ऑक्सिजन प्रकल्पास भेट देण्यात आली असून याप्रकल्पातून प्राप्त होणाऱ्या 600 ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ऑक्सिजन अभावी बंद असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डी.सी.एच.सी) पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांची झूमद्वारे मिटींग घेण्यात येवून रूग्णालयांनी रेमसिव्हिर व ऑक्सिजनच्या वापराबाबतचा अहवाल नियमीत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सिन्नर वैद्यकीय अधीक्षक यांना दिल्या आहेत.