अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का

काबूल हवाई तळावर तालिबानने केलेल्या भयंकर हल्ल्यात शेकडो लोक जखमी झाले आणि कित्येक लोक ठार झाले. तालिबानने अमेरिकेच्या प्रतिष्ठेला दिलेला हा जोरदार धक्का आहे. खरेतर अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या खुरासान गटाने केलेला हा हल्ला आहे. परंतु तालिबानला त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली आहे. याचा अर्थ तालिबान निष्पाप आहेत, असा मुळीच नाहि. नंतर अमेरिकन सैन्याने तालिबानी तळांवर आणि आयसिसच्या तळावर जबरदस्त हवाई हल्ले केले आणि त्यात कित्येक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. परंतु काबूल हवाई तळावर जो हल्ला करण्यात आला, तो अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का यासाठी म्हटले की हा सारा विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. अमेरिकन सैन्याची चोख बंदोबस्ताची भिंत फोडून हल्लेखोर तेथपर्यंत जाऊ कसे शकले आणि त्यांनी कसा हल्ला चढवला, हे कोडे तर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बिडेन यांनाही आहे. काबूल हवाई तळावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेची सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणून असलेली इज्जत मातीमोल झाली आहे. अमेरिकन गुप्तवार्ता विभाग हा जगातील सर्वात हुषार आणि तंत्रज्ञानाने समृद्ध समजला जातो. तसा तो आहेही. परंतु यावेळी मात्र हल्लेखोर असा हल्ला घडवतील, याची जराही कुणकुण या विभागाला लागू नये, यात हल्लेखोरांची हुषारी नाहि तर अमेरिकन गुप्तहेरांची असफलता आहे. अमेरिकन सैन्य असल्याने यापैकी कुणी हल्लेखोरांना फितूर झाले असण्याची शक्यताच नाहि. तरीही काबूल तळावर इतका जोरदार हल्ला अमेरिकन सैन्याच्या नाकाखाली झाला, हे बिडेन यांना पचण्यासारखे नाहि. काबूल तळावर जे अमेरिकन सैनिक तैनात होते, त्यांच्यावर हल्ले रोखण्याची जबाबदारी होती. पण ते सपशेल अपयशी ठरले. अर्थातच यामुळे अमेरिकेची प्रतिष्ठा गेली आणि बिडेन भयंकर संतप्त झाले आहेत. त्यांनी तसे संतप्त होणे साहजिक आहे. बिडेन यांनी लगेचच मारेकर्यांना शोधून ठार मारू, असे जाहिर केले आहे. परंतु कसे मारणार, हा सवाल आहे. कारण अमेरिकन सैन्याच्या माघारीची अखेरची मुदत आहे ३१ ऑगस्ट. त्यानंतर एकही अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात रहाणार नाहि. मग तुम्ही कसे शोधणार आणि कसे मारणार, हा सवाल बिडेन यांना केला पाहिजे. अमेरिकन सैन्याने नंतर आयसिस तळांवर हवाई हल्ले केले आणि त्यात आयसिस-केचे दोन दहशतवादी ठार झाले. बिडेन यांनी तर आणखी हवाई हल्ले केले जातील, असा इषाराही दिला आहे. पण त्याचा आता काहीही उपयोग नाहि. कारण अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तान सोडण्याची मुदत तर समाप्त होत आली आहे. बिडेन यांनी काहीही कारण नसताना आणि तालिबान अमेरिकेने देश सोडल्यावर तेथे हाहाःकार घडवणार, हे चांगले ठाऊक असताना अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. स्वतःला केवळ माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक चतुर आणि हुषार सिद्ध करण्यासाठी बिडेन यांनी घाईघाईत अफगाणिस्तान सोडण्याचे ठरवले. परंतु त्याची शिक्षा निरपराध अफगाण नागरिक, महिला आणि खुद्द अमेरिकेन सैनिकांना भोगावी लागली आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीचा निर्णय हा अत्यंत घिसाडघाईचा आणि अपरिपक्वतेचा निदर्शक आहे, हे बिडेन यांना आता लक्षात आले असेल. त्यांची अवस्था आता शरमेने चूर झाली आहे. तालिबानपासून सुटका करून आपली अडकलेली मान काढून घेण्यासाठी अमेरिकेने सैन्यमाघारीचा निर्णय घेतला. तो योग्य आणि चतुरही होता. मुळात अमेरिकेने या झमेल्यात पडायचेच नव्हते. त्यातूनही आता सुटका करून घेण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांच्या काळापासूनच अमेरिकेला वाटत होते. त्यातून अमेरिकन जनमतही विनाकारण आपल्या सैनिकांचा अफगाणिस्तानात बळी देण्याच्या विरोधात होते. परंतु अमेरिका हे विसरली की तालिबान हे अनेक गटांत विभागले गेले आहेत. त्याशिवाय अफगाणिस्तानात सर्वात खतरनाक गट आहे तो खुरासान आणि आयसिस ज्यांचा सरळ संबंध अल कायदाशी आहे. त्यांना सारे समर्थन आहे ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे. काबूल हवाई तळावर जो रक्तरंजित हल्ला झाला, तो या खुरासाननेच केला होता. तालिबान, खुरासान आणि पाकिस्तान यांची युती होती. पण आता खुरासानने तालिबान आणि पाकिस्तानलाही मागे टाकले आहे आणि त्यांनाही अडचणीत आणले आहे. या हल्ल्यामुळे तालिबानची प्रतिमा जगभरात मलिन होऊन गेली आहे. कारण तालिबानने अमेरिकेने देश सोडल्यावर हिंसाचार करणार नाहि, असे मान्य केले होते. किंबहुना त्या अटीवरच अमेरिकन सैन्याने माघार घेण्याचे ठरले होते. तालिबानवर आता कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाहित. तालिबानने आमच्या राज्यात अफगाण नागरिक सुरक्षित रहातील, असे वचन दिले होते. परंतु त्यावर आता कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाहि. याची किमत म्हणजे तालिबानला आता जे लोक अफगाणिस्तान सोडून जाऊ इच्छितात त्यांना देश सोडून जाण्यास परवानगी द्यावी लागली आहे. यापूर्वी तालिबानने देश सोडण्यास विरोध केला होता. काबूल हल्ल्यामुळे तालिबानला आपला पवित्रा सौम्य करावा लागला आहे. काबूल हवाई तळावरील हल्ल्याचा पाकिस्तानसह सर्वांनीच निषेध केला आहे, परंतु प्रश्न हा आहे की, खुरासान गटावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न का केला जात नाहि. अमेरिकेच्या चुकीचे माप तिच्या पदरात पुरेपूर आता घातले गेले आहे. कदाचित पुन्हा तालिबान आणि खुरासानला ध़डा शिकवण्यासाठी अमेरिका पुन्हा या युद्धात भाग घेईल आणि पुन्हा त्याच अध्यायाची पुनरावृत्ती होईल, जेव्हा अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानात शिरकाव केला होता.